प्रार्थना आणि ध्यान
श्री श्रीमाताजींका संदेश
वर्ष १९४१-१९४८ की अवधि के दौरान -
मूळ फ्रेंचमधून इंग्रजीत अनुवादित पुस्तकासाठी इंग्रजीमध्ये लिहिलेली प्रस्तावना |
हा संदेश | येथे ऐका |
भगवंताला कांहीं लोक आपला आत्मा देतात, कांहींजण जीवन देतात, कांहीं त्याला आपलें कर्म अर्पण करतात, तर कांहीं आपली संपत्ति वाहतात. पण आपल्या सर्वस्वाचें आपल्या जवळ जें कांहीं आहे त्याचें - आपला आत्मा, जीवन, कर्म आणि संपत्ति या सर्वांचें समर्पण फारच थोडे लोक करतात; तींच परमेश्वराची खरी लेंकरें होत. दुसरे कांहींच देत नाहींत. त्यांचा मान, त्यांचें सामर्थ्य, त्यांचें ऐश्वर्य कितीहि असले, तरी ईश्वरी कार्याच्या दृष्टीनें ते अर्थहीन शून्य आहेत.
भगवंताचे चरणीं निःशेष समर्पण करण्याचीं ज्यांची अभीप्सा आहे त्यांचासाठीं हें पुस्तक आहे.
- श्रीमाताजी
१९४१ - १९४८
वर्ष: १९१२
२ नोव्हेंबर, १९९२
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
अखिल वस्तुमात्रामध्यें प्रेम, प्रकाश व जीवनरूपानें वसणाऱ्या हे ईश्वरा ! माझें संपूर्ण अस्तित्व तत्त्वतः मी तुला अर्पण केलें असले, तरीहि तें अर्पण सर्वांगीण व सांगोपांग करीत जाणें मला कठीण वाटत आहे. हें कळण्यास मला कित्येक आठवडे लागले कीं, तुला उद्देशून दररोज प्रार्थना करणें हाच या ध्यानावस्थेस लिखित स्वरूप देण्याचा खरा उद्देश आहे, त्यांतच त्याची सार्थकता आहे. तुझ्याशी कित्येकदां होणाऱ्या संवादांपैकीं अंशभागाला अशा रीतीनें दररोज मी मूर्त स्वरूप देत जाईन; हें आत्म-निवेदन शक्य तितक्या चांगल्या रीतीनें मी तुझ्यासमोर करीन. वास्तविक तूं तर स्वतःच सर्वकाहीं आहेस; त्यामुळें, मी तुला कांहीं वेगळें सांगूं शकेन असें मला वाटते म्हणून नव्हे, तर एका दृष्टीनें आमची कृत्रिम व बाह्य दृष्टि आणि समजशक्ति तुझ्या पद्धतीहून अगदीं भिन्न व तुझ्या स्वभावाच्या अगदी उलट असते म्हणून हा प्रयत्न करीन. शिवाय, तुला सन्मुख होऊन या गोष्टींविषयीं विचार करण्याच्या वेळीं तुझ्या दिव्य प्रकाशांत मी स्वतःस बुडवून घेऊं लागेन. म्हणजे क्रमाक्रमानें त्यांचें वास्तव स्वरूप काय आहे तेंच मला दिसू लागेल; शेवटीं एक दिवस असा येईल कीं, तुझ्याशीं मी स्वतःचें एकत्व अनुभवलेलें असल्यामुळे तुला सांगावयास असें मजजवळ अधिक कांहींच रहाणार नाहीं; कारण त्यावेळीं मी 'तूंच' झालेली असेन. माझें प्राप्तव्य हेंच असेल, माझे सर्व प्रयत्न याच विजयाकडे जाण्यासाठीं तिकडे अधिकाधिक झुकत राहतील. ज्या दिवशीं मी 'तूंच' होऊन गेल्यानें 'मी' असें म्हणणें मला अशक्य होईल असा दिवस केव्हां येईल असा मला ध्यास लागला आहे.
अजूनहि दिवसांतून कितीतरी वेळां मी अशी वागते कीं,
ज्यावेळीं माझीं कामें तुला समर्पित झालेलीं नसतात. त्यामुळें ताबडतोब एक प्रकारची, वर्णन करतां येणार नाहीं अशी अस्वस्थता मनांत उत्पन्न होऊन ती अस्वस्थता हृदयांतील वेदनांनी माझ्या शारीरिक जाणिवेंत प्रकट होते. नंतर मी माझ्याच कृतीकडे तटस्थ दृष्टीनें बघते आणि तेव्हां ती मला हास्यास्पद, बालिश आणि निंद्य भासते; मला खेद वाटतो, क्षणमात्र मी दुःखी कष्टी होते; पण लगेच बालसुलभ विश्वासानें मी स्वतः तुझ्यामध्यें बुडी घेते; स्वतःला विसरून जाते आणि माझ्याकडून आणि माझ्या अवती- भोंवतीं झालेल्या प्रमादांचें – या दोन्ही गोष्टी एकच आहेत- परिमार्जन करण्यासाठीं तुझ्याकडून प्रेरणा मिळावी व आवश्यक असें सामर्थ्य मिळावें म्हणून मी वाट पहात रहाते; कारण, सर्व क्रियांचें संपूर्णतः परस्परावलंबन निश्चित करणाऱ्या विश्वगत एकत्वाचें मला आतां सतत आणि स्पष्ट असें आकलन होत आहे.
३ नोव्हेंबर १९१२
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
सर्वांना संजीवन देणाऱ्या अग्नीप्रमाणें तुझा दिव्य प्रकाश माझ्या ठिकाणीं वसूं दे; तुझें दिव्य प्रेम माझ्या सर्वांगांत प्रविष्ट होऊं दे. माझें मन, हृदय आणि शरीर यांमध्यें तुझीच सत्ता सार्वभौम आणि स्वामी असावी म्हणून माझ्या साऱ्या अस्तित्वानें अभीप्सा धरली आहे; ती तुझीं सालस साधनें आणि प्रामाणिक सेवक होऊं देत.
१९ नोव्हेंबर १९१२
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
अतिशय तळमळीनें तुला शोधणाऱ्या एका इंग्रज तरुणास मीं काल म्हटलें कीं, मला परमेश्वराचा निश्चित शोध लागला आहे, आणि त्याच्याशीं मी सतत एकत्व अनुभवत आहे. खरोखरीच माझी अशी स्थिति असून, तिची मला चांगली जाणीव आहे. माझे सर्व विचार तुझ्याकडेच येत आहेत, माझ्या सर्व क्रिया तुला समर्पित होत आहेत; तुझें दिव्य सान्निध्य माझ्या बाबतींत अगदीं निश्चयात्मक, अविकारी आणि सततचें झालें आहे आणि तुझी दिव्य शांति माझ्या हृदयांत निरंतर भरून राहिली आहे. तरीपण ही एकत्वाची स्थिति, भविष्यकाळीं शक्य असलेल्या स्थितीशीं तुलना करतां, अगदींच सामान्य आणि अनिश्चित स्वरूपाची आहे हें मला माहीत आहे. ज्या अवस्थेमध्यें 'मी' ही भावना समूळ लुप्त होऊन जाईल, अशा एकत्वाच्या अनुभवापासून मी अजूनहि दूर, खरोखरी फारच दूर आहे. मी स्वतःचा निर्देश करण्यासाठीं अजूनहि 'मी' या शब्दाचा उपयोग केला तरी, अशा प्रत्येक वेळीं मला मोठें बंधनच वाटतें; कारण जो भाव, विचार व्यक्त होऊ पहात आहे तो दर्शविण्यास हा शब्द अपात्र असा आहे. मला वाटतें कीं, एकमेकांत बोलावयाचें तर माणसाला 'मी' हा शब्द अपरिहार्यपणें वापरावाच लागतो. तरी या 'मी' नें काय व्यक्त केलेलें असतें, यावरच वास्तविक सर्व कांहीं अवलंबून आहे. मी यापूर्वी आधींच कितीतरी वेळां 'मी' हा शब्द उच्चारला आहे, पण प्रत्येक वेळीं तूंच माझ्यामध्यें बोलतोस. कारण विभक्तपणाचें माझें भान हरपलें आहे.
तरीपण हें सर्व अगदी बीजावस्थेत आहे आणि पूर्णत्वाच्या दिशेनें त्यामध्यें अखंड प्रगति होत राहील. तुझ्या सर्वशक्तिमत्ते विषयीं जो प्रसन्नतायुक्त विश्वास आहे, त्यामध्यें कितीतरी समाधान देणारें तुझें अभयदान आहे !
सर्व तूं आहेस, तू सर्वत्र आणि सर्वगत आहेस आणि कर्म करणारें हें शरीर, तुझेंच स्वतःचें शरीर आहे, जसें अखिल दृश्य- विश्वहि तुझेंच शरीर आहे. या देहामध्यें तूंच श्वसन करतोस, विचार करतोस आणि प्रेम करतोस; तो हा देह, 'तूंच स्वतः' असून, तुझा तत्पर सेवक होण्याची इच्छा करत आहे.
२६ नोव्हेंबर १९१२
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
प्रतिक्षणीं तुझ्या प्रीत्यर्थ, खरोखर किती कृतज्ञतेचें गान गावेसें वाटतें मला! सर्वत्र आणि माझ्या भोवतालच्या प्रत्येक वस्तूमध्यें तूं स्वतः स प्रकट करीत आहेस, माझ्या ठिकाणीं तुझा संकल्प व चेतना सतत अधिक स्पष्टतेनें व्यक्त होत आहे, इतकी की 'मी' आणि 'माझे' हा स्थूल पातळीवरील भ्रम जवळ जवळ सर्वस्वीं नाहींसा झाला आहे. तुला प्रकट करणाऱ्या महान् प्रकाशामध्यें अजूनहि कांहीं सांवल्या, कांहीं दोष दिसून येत असले, तरी तुझ्या उज्ज्वल प्रेमाचें अद्भुत, प्रखर तेज त्यांना दीर्घ काळ कसें सहन होईल ? 'मला', माझ्या अस्तित्वाला ज्या रीतीनें घडवून तूं आकाररूप देत आहेस, त्याची जी स्पष्ट जाणीव मला आज प्रातःकाळी झाली तिला सुव्यवस्थितपणें, स्पष्ट, रेखीव पैलू पाडलेल्या मोठ्या मौल्यवान हिऱ्याची उपमा कांहींशीं देतां येईल; सुंदर घडण, कणखरपणा, निर्मळ स्वच्छता, पारदर्शकता यांबाबतीत तें रूप हिऱ्याप्रमाणें असले, तरी त्यांतील तीव्र आणि सतत प्रगतिशील जिवंतपणाच्या दृष्टीनें उज्ज्वल आणि तेजस्वी ज्वालेप्रमाणें तें होतें. परंतु वास्तविक यापेक्षांहि कांहींतरी अधिक, कांहींतरी अधिक चांगलें असें तें होतें. कारण आंतर आणि बाह्य सर्व प्रकारच्या संवेदनांच्या पलीकडील तो अनुभव होता आणि बाह्य जगताचें प्रत्यक्ष भान जेव्हां मला पुनः होऊं लागले, त्यावेळीं फक्त माझ्या मनःचक्षूसमोर हीच प्रतिमा उभी राहिली.
कोणताहि अनुभव खरोखर तूंच सुफल, समृद्ध करतोस, तूंच जीवन प्रगमनशील करतोस, आपल्या दिव्य प्रकाशानें क्षणार्धांत अंधःकार नाहींसा करतोस; प्रेमाला शक्ति प्रदान करतोस, जड पार्थिव तत्त्वामध्यें सर्वत्र शाश्वत अनंततेविषयीं लागलेल्या उदात्त तृष्णेच्या रूपानें व्यक्त होणारी उत्कट आणि अद्भुत आकांक्षा तूंच निर्माण करतोस.
'तूं' सर्वत्र आणि नित्य निरंतर आहेस, वस्तुमात्राचें सारसर्वस्व किंवा जगताच्या आविष्करणामध्येंहि केवळ तुझ्याशिवाय दुसरें कांहींच नाहीं.
हे छायांनो आणि आभासांनो विरून जा ! हे दुःखा, निस्तेज हो, अदृश्य हो.
सर्वश्रेष्ठ परमेश्वरा तेथें, सर्वत्र तूंच नाहींस कां ?
२८ नोव्हेंबर १९१२
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे बाह्य जीवन, दररोजची, दर क्षणाची प्रत्येक कृति म्हणजे, ध्यान व चिंतन यांत व्यतीत केलेल्या वेळेंचें अनिवार्य पूरकच नव्हे कां ? बाह्य जीवन व ध्यान - चिंतन यांमध्यें खर्च केलेल्या वेळेच्या प्रमाणावरून साधनेच्या पूर्वतयारीसाठीं आणि प्रत्यक्ष सिद्धीसाठीं किती प्रयत्न करावे लागतात यांचेंच तंतोतंत प्रमाण दिसून येत नाहीं कां ? ध्यान व चिंतनाचा परिणाम म्हणजे एकात्मता- त्यांच्यांतून विकसित झालेलें पुष्प. दैनंदिन कार्य ही ऐरण आहे; चिंतनानें प्रदान केलेला प्रकाश स्वीकारतां यावा म्हणून आपणांतील प्रत्येक अंग शुद्ध, सूक्ष्म, लवचीक आणि परिपक्व होण्यासाठी या ऐरणीवर ठोकून ठोकून तयार व्हावें लागतें. चिंतनच त्यांना हा प्रकाश प्रदान करतें. सर्वांगीण विकसनाकरितां जोपर्यंत बाह्य कर्म अनावश्यक झालेलें नाहीं, तोपर्यंत एकामागून एक, आपल्यांतील सर्व अंशांना या मुशींतून तावून सुलाखून निघावें लागतें. असें झाल्यावर मगच सर्व कृती, तुझा आविष्कार करण्याचें साधन बनतील; यासाठीं कीं त्यायोगें इतरहि दुसऱ्या चेतना- केंद्रांना जागृति यावी आणि तेथेंहि असेंच शुद्धि करण्याचें व प्रदीप्त करण्याचें द्विविध कार्य व्हावें. अभिमान व आत्म- संतुष्ट राहण्याची वृत्ति म्हणजे मार्गावरील सर्वांत हानिकारक अडथळे आहेत. अतिशय नम्र भावानें आपण सर्व बारीकसारीक संधींचा उपयोग करून घेतला पाहिजे; आपणांतील असंख्य अंशांचें मर्दन करून, त्यांचें शुद्धीकरण करण्यासाठीं, त्यांना लवचीक करण्यासाठीं, त्यांना व्यक्तिनिरपेक्ष करण्यासाठीं, आत्मविस्मृति, परित्याग, भक्ति, दयालुता आणि कोमलता शिकविण्यासाठी या संधी आलेल्या असतात. या सर्व वृत्ती जेव्हां अंगवळणीं पडतात, तेव्हां आपणांतील सर्व अंश मिळून दिव्य तत्त्वाच्या चिंतनांत सहभागी होण्यास, परमोच्च एकाग्र अवस्थेत तुझ्याशी एकरूप होण्यास तयार होतात. म्हणूनच उच्च कोटींतील साधकांच्या बाबतींत सुद्धां हें कार्य दीर्घ व संथपणानें व्हावें लागतें. त्याचबरोबर एकाएकी आकस्मिक घडणारीं परिवर्तनें हीं सर्वांगपूर्ण होऊं शकत नाहींत असे मला वाटतें. आकस्मिक परिवर्तनांनीं व्यक्तीचा जीवनविषयक दृष्टिकोन बदलून जातो; निश्चितपणें योग्य व सरळ मार्गास ती लागते. परंतु ध्येय खऱ्या अर्थानें प्राप्त होण्याच्या दृष्टीनें सर्व प्रकारचे व प्रत्येक क्षणी येणारे असंख्य अनुभव घेण्याची जी आवश्यकता असते, त्यांतून मात्र कोणीच सुटू शकणार नाहीं.
हे परम स्वामिन्! माझ्या अंतरंगी व प्रत्येक वस्तूच्या ठिकाणीं तूं प्रकाशत आहेस; तुझा दिव्य प्रकाश प्रकट होऊं दे आणि सर्वांकरितां तुझा दिव्य शांतीचें राज्य येथें येऊं दे.
२ डिसेंबर १९१२
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
जोपर्यंत अस्तित्वांतील एखादाहि अंशभाग, एखादाहि विचार- तरंग बाह्य प्रभावाखालीं जात असेल, जोंवर अस्तित्व सर्वांशांनीं तुझ्याच सत्तेखाली आलेले नसेल, तोपर्यंत तुझ्याशी खरेखुरें ऐक्य साधलें आहे असें म्हणतां येणार नाहीं; सुव्यवस्थाविरहित आणि प्रकाशहीन असें अजूनहि कांहीं भयंकर मिश्रण तेथें अस्तित्वांत आहे. कारण ज्याप्रमाणें अखिल पृथ्वी हें भौतिक जगांतील व हें भौतिक जगतहि अखिल विश्वांतील एक गोंधळाचें व अंधःकाराचें आहे, त्याचप्रमाणें जीवनांतील तो अंशभाग अथवा ती विचारलहर म्हणजे गोंधळ व अंधःकार यांचें एक जगच असतें.
३ डिसेंबर १९१२
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
तुझ्या मार्गदर्शनास विश्वासपूर्ण शरण गेल्याचा काय प्रभाव असतो याचा काल रात्रीं मला अनुभव आला. कांहींएक आकलन होण्याची जेव्हां खरोखरीच आवश्यकता असते, तेव्हां तें आपल्याला आकलन होतेंच; आणि अशा वेळीं तुझ्या प्रकाशासमोर मन जितकें अधिक निश्चल राहील, तितका तो प्रकाश, ज्ञान अधिक सुस्पष्ट व अधिक पूर्णतेनें व्यक्त होईल.
तूं माझ्या ठिकाणीं जें बोललास तें मीं ऐकलें; तूं जें काय बोललास त्यांतील सूत्रबद्ध सारतत्त्व लोपून जाऊं नये म्हणून तें लिहून ठेवावें अशीहि इच्छा मला झाली - कारण तूं जें काय बोललास तें पुनः मला सांगतां येणार नाहीं - पण त्यानंतर माझ्या मनांत विचार आला कीं, अशा तऱ्हेचा 'जपून ठेवण्याचा' विचार हा सुद्धां तुझ्याविषयीं उपमर्दकारक अविश्वास असल्याचेंच द्योतक आहे. कारण जें काय मी होणें आवश्यक आहे तसें मला करण्यास तूं पूर्ण समर्थ आहेस माझ्यामध्यें आणि माझ्यावर कार्य करूं देण्यास माझी वृत्ति जितकी अनुकूल असेल, तितक्या प्रमाणांत तुझी असीम सर्व-समर्थता निश्चित कार्यकारी होईल. प्रत्येक वस्तूंत व प्रत्येक ठिकाणीं तुलाच कसें पहावयाचें याचें ज्यांना ज्ञान आहे, त्यांच्या बाबतींत दर क्षणीं, जें घडणें आवश्यक आहे तें शक्य
क्या अधिकांत अधिक पूर्णांशानें निश्चितपणें घडलेलें असतेंच, कळणें खरोखर किती भाग्याचें आहे! आतां यापुढें ना भीति, अस्वस्थता, ना चिंता. दुसरें कांहीं नाहीं, फक्त दिव्य प्रसन्नता, पूर्ण श्रद्धा आणि सर्वश्रेष्ठ अचल शांति !
५ डिसेंबर १९१२
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
शांति आणि निश्चल नीरवता यांमध्येंच शाश्वत तत्त्व प्रकट होतें; कशानेंहि स्वतःला अस्वस्थ होऊं देऊं नका, म्हणजे शाश्वत तत्त्व प्रकट होईल; कोणत्याहि अवस्थेमध्यें संपूर्ण समता राखा म्हणजे शाश्वत तत्त्व तेथेंच उपस्थित असलेलें तुम्हांस दिसेल... खरेंच, तुझा शोध करण्यासाठी आम्ही अत्यधिक उत्कंठा धरतां कामा नये, अतीव प्रयास करतां कामा नयेत; कारण, ही उत्कंठा आणि हे प्रयासच तुला झांकून टाकणाऱ्या एखाद्या पडद्याप्रमाणें ठरतात. तुझ्या दर्शनाचीहि आम्हीं इच्छा धरतां कामा नये, कारण ती इच्छा सुद्धां एक प्रकारची मनाची प्रक्षुब्धताच असते व त्यामुळें तुझें शाश्वत सान्निध्य झांकोळलें जातें. केवळ पूर्णतम शांति, प्रसन्नता आणि समता यांमध्येंच, "सर्वकांहीं 'तूंच' आहेस, तसेंच तूंच 'सर्वकांही' आहेस", हें कळतें. पण संपूर्ण विशुद्ध आणि शांत अशा या वातावरणांत यत्किंचित् जरी स्पंदन निर्माण झालें, तरी तेवढ्यानेंहि तुझ्या आविष्कारामध्ये अडथळा येतो. जरासुद्धां घाई नको, अस्वस्थता नको, ताण नको; सर्वकांहीं तूंच, एकमात्र तूंच आहेस अशी जाणीव कोणत्याहि प्रकारचें विश्लेषण किंवा निरीक्षण तांहि आली पाहिजे; म्हणजें तेथें तूंच उपस्थित असणार नात शंका नाहीं. कारण अशा वेळीं सर्वकांहीं पावन शांति आणि पवित्र नीरवता यांमध्यें परिणत होऊन जातें.
जगांतील सर्व ध्यानापेक्षां ही अवस्था अतिशय श्रेष्ठ आहे.
७ डिसेंबर १९१२
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
एकांतामध्यें तेवत असलेल्या ज्योतीप्रमाणें, सरळ वरवर जाणा-या अविचल सुगंधित धूम्रवलयाप्रमाणें माझें प्रेम तुझ्याकडे येत आहे. जगामध्यें तुझा संकल्प कार्यकारी व्हावा, तुझा प्रकाश आविर्भूत व्हावा, तुझी शांति प्रसृत व्हावी आणि तुझ्या प्रेमानें सारें जग व्यापून टाकावें म्हणून तर्कवितर्क न करणाऱ्या आणि निश्चित अशा बालकाप्रमाणें मीं माझा भार तुझ्यावर टाकला आहे. ज्यावेळेस तूं इच्छा करशील, तेव्हां मी तुझ्यामध्यें निवास करीन, मी 'तूंच' होऊन जाईन आणि कोणत्याच प्रकारचें द्वैत रहाणार नाहीं, अशा शुभ समयाची, कोणत्याहि प्रकारें अधीर न होतां मी वाट पहात आहे; आणि एखादा जलप्रवाह ज्याप्रमाणें संथपणानें असीम सागराकडे वाहत जातो, त्याप्रमाणें अबाधितपणें मी स्वतःला तुझ्याकडे येण्यास प्रवृत्त करीत आहे.
तुझी शांति माझ्यामध्यें आहे आणि प्रत्येक गोष्टींत अनंततेच्या नीरवतेसह केवळ 'तूंच' उपस्थित आहेस हें त्याच शांतीमध्यें मी पहात आहे.
१० डिसेंबर १९१२
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे परम स्वामिन्, सनातन गुरुदेव, तुझ्या मार्गदर्शनावर परिपूर्ण विश्वास टाकल्यानें होणाऱ्या अतुल सफलतेची प्रचीति काल पुनः एकदां तूं मला प्रदान केलीस. माझ्याकडून कोणत्याहि प्रकारचा विरोध न होतां काल माझ्या मुखद्वारां तुझा प्रकाश आविष्कृत झाला. त्यावेळीं माझें हें शरीर-साधन अति सालस, नमनीय आणि धारदार झालें होतें.
अखिल वस्तुजातामध्यें आणि प्राणिमात्रांमध्यें तूंच कर्ता आहेस; निरपवादपणें सर्व क्रियांमध्यें तूंच आहेस हें पाहण्याइतका जो तुझ्या समीप आला आहे त्याला, प्रत्येक कर्मास आशीर्वादाचें रूप कसें द्यावयाचें हें कळून येईल.
तुझ्याचमध्यें निरंतर आणि उत्तरोत्तर अधिकाधिक निवास करणें हीच एक गोष्ट महत्त्वाची आहे. इंद्रियभ्रम आणि मोहजाल यांच्या अतीत जाऊन, पण कर्मांपासून अलिप्त न रहातां, कर्माकडे पाठ न फिरवितां किंवा तें न टाळतां, कोणतेंहि कां कर्म असेना, तें करीत असतांना नित्य - निरंतर तुझ्याचमध्यें निवास करणें ही गोष्ट महत्त्वाची आहे - कर्म टाळणें म्हणजे व्यर्थ आणि हानिकारक संघर्ष करणें होय. तुझ्याचमध्यें निरंतर वास्तव्य केल्यानें भ्रमाचा निरास होतो, इंद्रियजन्य मायाजाल विरून जातें, कर्मफलबंधन तुटून जातें आणि सर्व गोष्टींचें तुझ्या सनातन सत्तेच्या वैभवपूर्ण आविष्कारा- मध्यें परिवर्तन होऊन जातें.
तथास्तु!
११ डिसेंबर १९१२
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
आणखी दुसरा एक पडदा विदीर्ण होऊन एकत्वास अधिक पूर्णता यावी म्हणून, त्वरा न करतां, अशांत न होतां मी प्रतीक्षा करीत आहे. लहान-सहान अपूर्णता आणि अगणित आसक्ती यांनींच हा पडदा बनलेला आहे हें मला माहीत आहे... हें सर्व कसें नाहींसें होईल ? असंख्य लहान लहान प्रयत्नांचा परिणाम म्हणून आणि क्षणभरहि खंड न पडतां, जागरूक राहिल्यानें हळुहळू हा पडदा नाहींसा होणार कीं तुझ्या सर्वशक्तिमान् प्रेमाच्या प्रचंड प्रकाशानें तो क्षणार्धांत नष्ट होणार हें मला माहीत नाहीं आणि हा प्रश्न मी स्वतःला विचारीतहि नाहीं. तूंच एकमात्र कर्ता आहेस आणि मी एक साधन आहे; तुझ्या इच्छेशिवाय कांहींच घडूं शकत नाहीं या निश्चयपूर्ण श्रद्धेनें मी प्रतीक्षा करीत आहे, शक्य तितकी जागरूक रहात आहे. जेव्हां हें साधन पूर्णतर अभिव्यक्तीसाठीं योग्य होईल तेव्हां अगदी स्वाभाविकपणेंच ती अभिव्यक्तीहि होईल.
तुझ्या दिव्योदात्त अस्तित्वाची साथ देणाऱ्या आनंदाच्या निःशब्द लहरींचें स्वरवृंद - संगीत आतांहि पडद्यामागून ऐकूं येत आहे.
वर्ष: १९१३
५ फेब्रुवारी १९१३
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
माझ्या हृदयाच्या नीरवतेमध्यें सुमधुर संगीताप्रमाणें तुझा आवाज ऐकूं येत आहे; माझ्या मेंदूमध्यें शब्दांच्या रूपानें तो अनुवादित होत आहे. ते शब्द पुरेसे अर्थवाहक नसले, तरी तुझ्या अस्तित्वानें ते परिपूर्ण भरलेले आहेत. हे शब्द पृथ्वीला उद्देशून सांगत आहेत, “हे दीन, दुःखी पृथ्वीदेवी, तूं लक्षांत ठेव कीं, मी तुझ्यामध्यें विद्यमान आहे. तूं निराश होऊं नकोस; कारण तुझा प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक दुःख, प्रत्येक आनंद आणि प्रत्येक शोकावेग, तुझ्या हृदयाची प्रत्येक हांक, तुझ्या आत्म्याची प्रत्येक अभीप्सा, तुझ्या ऋतूंचें प्रत्येक पुनरागमन सर्वकांहीं-निरपवाद सर्वकांहीं- तुला जें दुःखदायक वाटतें किंवा जें आनंददायी वाटतें जें कुरूप भासतें किंवा जें सौंदर्यपूर्ण दिसतें तें या सर्व गोष्टी बिनचूकपणें, निश्चितपणें तुला माझ्याकडेच घेऊन येतात. मी आहे अनंत शांति, छायाशून्य प्रकाश आणि संपूर्ण समस्वरता, निश्चिति, विश्राम आणि परम कृपा.
ऐक, हे पृथ्वी, ओजस्वी वाणी घुमत आहे ती ऐक.
ऐक आणि पुनः धैर्य धारण कर !
८ फेब्रुवारी १९१३
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे परमेश्वरा, तूं माझा आसरा आणि तूं माझा आशीर्वाद. तूंच माझी शक्ति आणि स्वास्थ्य. तूंच माझी आशा आणि धैर्य. तूं आहेस सर्वोत्तम शांति, अमिश्र आनंद आणि संपूर्ण प्रसन्नता. माझें सारें अस्तित्व अमर्याद कृतज्ञतेनें आणि अविरत पूजाभावानें तुझ्यासमोर प्रणिपात करीत आहे; माझ्या हृदयामधून आणि मनामधून हा पूजनभाव सुगंधित उदबत्तीच्या पावन धूमशिखेप्रमाणें तुझ्या समीप वरवर येत आहे.
मला तुझा या जगांतील संदेशदूत बनव म्हणजे असीम दयार्णव मला प्रदान केलेल्या दिव्यानंद प्रसादाची माधुरी उत्सुक .ले सर्व लोक चाखूं शकतील. तुझ्या शांतीचें साम्राज्य अखिल अवनीतलावर पसरूं दे.
१० फेब्रुवारी १९१३
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
तुझा स्वतःचा आविष्कार करण्याकरितां हें माझें दुबळें आणि अपूर्ण शरीर तूं वापरतोस म्हणून नव्हे, तर तूं स्वतः प्रकट झाला आहेस येवढ्याकरतांच केवळ माझें सारें अस्तित्व कृतज्ञतापूर्वक तुझ्याप्रत उन्नत होत आहे. कारण तुझें प्रकट होणें हेंच मुळीं मोठ्यांत मोठें वैभव, आनंदाचा आनंद आणि आश्चर्याचे आश्चर्य आहे. उत्कट जिज्ञासेनें तुझा जे शोध करतात, त्या सर्वांनीं हें जाणलें पाहिजे कीं, जेव्हां जेव्हां तूं असण्याची आवश्यकता असते, तेव्हां तेव्हां तेथें तूं असतोसच; आणि तुला शोधण्याऐवजी प्रत्येक क्षणीं सर्वस्वीं, सर्वांगांनीं तुझ्याच सेवेस वाहून घेऊन, तुझी केवळ प्रतीक्षा करण्याइतकी परम श्रद्धा जर त्यांच्या ठिकाणीं असेल, तर आवश्यकता निर्माण होतांच तूं तेथें निश्चित उपस्थित असशीलच; आणि वास्तविक तुझा आविष्कार कितीहि भिन्नभिन्न आणि कित्येकदां अनपेक्षित रूपांनी होत असला, तरी तुझ्या आविष्काराची आवश्यकता नेहमींच असते, नाहीं कां ?
तुझ्या वैभवाचा उद्घोष होऊं दे.
त्यानें जीवन पावन होऊं दे,
त्यानें मानवांचीं हृदयें रूपांतरित होऊं देत,
आणि तुझ्या शांतीचें अधिराज्य या पृथ्वीवर प्रस्थापित होऊं.
१२ फेब्रुवारी १९१३
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
एखादें फूल गाजावाजा न करतां किंवा धडपड न करतां जसें आपोआप सहजतेनें फुलतें, आपलें सौंदर्य व्यक्त करतें आणि आपला सुगंध दरवळवितें, त्याप्रमाणें कोणत्याहि कृतीमागील, अभिव्यक्ती- मागील धडपड नाहींशी झाली म्हणजे ती कृति अतिशय सहज होते. अशा सहजतेमध्येंच महत्तर शक्ति वास करते; तिच्यामध्यें कमीतकमी संमिश्रण असून, त्यापासून हानिकारक प्रतिक्रिया सर्वांत कमी उद्भवतात. प्राणशक्तीवर विश्वास ठेवतां कामा नये, कर्म- मार्गावरील तें एक विलोभन आहे; तिच्या जाळ्यामध्यें सांपडण्याचा नेहमींच धोका असतो; कारण तत्काळ फलप्राप्तीची चटक ती तुम्हांला लावते आणि 'काम चांगले' करण्याच्या पहिल्या उत्साहामध्यें, अशा शक्तीचा उपयोग करण्यास आपण स्वतःस प्रवृत्त होऊं देतो. परंतु त्यामुळे लवकरच आपली सर्व कृति योग्य मार्गापासून दूर जाते आणि आपण जें कांहीं करतो त्यामध्यें भ्रम आणि मृत्यु यांचीं बीजें पेरली जातात.
सरलता! सरलता! खरोखर तुझ्या उपस्थितीचें पावित्र्य किती मधुर आहे !
११ मे १९१३
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
माझ्यावरच्या व्यावहारिक जबाबदाऱ्या संपल्याबरोबर त्यांसंबंधींचे सर्व विचार माझ्यापासून पार दूर पळून जातात आणि मी केवळ 'तूं' आणि 'तुझी सेवा' यांमध्यें सर्वस्वीं तल्लीन होऊन जाते. नंतर त्या संपूर्ण शांतीमध्यें व निःस्तब्धतेमध्यें माझी इच्छा मी तुझ्या इच्छेमध्यें मेळवून टाकते आणि त्या सर्वांगपूर्ण निश्चल- नीरवतेमध्यें तुझें सत्य प्रकट करणारी वाणी मला ऐकूं येते.
तुझ्या इच्छेची जाणीव होण्यामध्यें व आमची इच्छा तुझ्या इच्छेशी एकरूप करण्यामध्येंच खऱ्या स्वातंत्र्याचें आणि सर्वशक्ति- मत्तेचें रहस्य आढळून येतें. त्याचप्रमाणें शक्तींना नवचैतन्य देण्याचें व जीवनाचें रूपांतर करण्याचें रहस्यहि त्यांत सामावलेलें आढळून येतें.
तुझ्या इच्छेची जाणीव होण्यामध्यें व आमची इच्छा तुझ्या इच्छेशी एकरूप करण्यामध्येंच खऱ्या स्वातंत्र्याचें आणि सर्वशक्ति- मत्तेचें रहस्य आढळून येतें. त्याचप्रमाणें शक्तींना नवचैतन्य देण्याचें व जीवनाचें रूपांतर करण्याचें रहस्यहि त्यांत सामावलेलें आढळून येतें.
नित्य-निरंतर व सर्वांगांनी तुझ्याशीं एकत्व प्राप्त करून घेणें म्हणजेच ‘प्रत्येक अडथळा आम्ही ओलांडून जाऊं व सर्व आंतर- बाह्य अडचणींवर विजय मिळवूं शकूं ' असें आश्वासन मिळविणें होय.
हे परमेशा, परमेशा, असीम आनंदानें माझें हृदय भरून जात आहे. आनंदगानाच्या अद्भुत लहरी माझ्या मस्तकामध्यें उसळत आहेत; आणि तुझ्या निश्चित विजयावर संपूर्ण विश्वास ठेवल्यामुळें परम शांति आणि अजिंक्य शक्ति अनुभवास येत आहे. तूं माझें सारें अस्तित्व भरून टाकत आहेस, तू त्याला संजीवन देत आहेस, त्याच्या सुप्त शक्ति-निर्झरांना गति देत आहेस, समजशक्तीस उजाळा देत आहेस, त्यांतील जीवनशक्ति तं अधिक तीव्र करीत आहेस, त्याचें प्रेम तूं दसपटीनें वर्धमान करीत आहेस; आणि आतां, मला हें कळत नाहीं कीं, सारें विश्व 'मी' आहे की मी 'विश्व' झाले आहे; तूं 'माझ्यांत' वसत आहेस कीं 'मी' तुझ्यांत ? एकमात्र तूंच विद्यमान आहेस आणि सर्वकांहीं तूंच आहेस; आणि तुझ्या अनंत कृपेच्या लहरींनीं सारें जग भरून टाकलें आहे, त्यांनी ओतप्रोत भरून वहात आहे.
हे भू-भागांनो, गान गा; देशोदेशींच्या लोकांनो, गान गा; हे मानवांनो, गान गा.
दिव्य सुसंवाद सर्वत्र विद्यमान आहे.
१८ जून १९१३
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
तुला अभिमुख होणें, तुझ्याशीं एकत्व पावणें, तुझ्यामध्यें निवास करणें आणि तुझ्यासाठींच जीवन जगणे यांत परम आनंद आहे, विशुद्ध प्रसन्नता आहे, अविकारी शांति आहे. असें करणें म्हणजे अनंताच्या वातावरणांत श्वास घेणें आहे, अनंत नित्य काळामध्यें रारी मारणें आहे, स्वतःच्या मर्यादांची जाणीव सोडून, देश आणि काळ यांच्या अतीत जाण्यासारखें आहे. या वरदानाची जणुं भीति वाटत असल्याप्रमाणें लोक यापासून दूर कां पळतात? ही अविद्या, हें अज्ञान खरोखर किती विचित्र वस्तु आहे ? ही अविद्याच सर्व दुःखाचें मूळ आहे ! ज्यामुळें मनुष्याला सौख्य लाभतें, त्याच नेमक्या गोष्टीपासून हें अज्ञान मनुष्यास दूर ठेवतें आणि संपूर्णतः संघर्ष व दुःख यांनीं बनलेल्या सामान्य जीवनाच्या दुःखद पाठशाळेंत त्यास जखडून ठेवतें !
२१ जुलै १९१३
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
अजूनहि कितीतरी धीर धरण्याची आवश्यकता आहे ! प्रगतीच्या पायऱ्या किती अस्पष्ट आणि अनाकलनीय आहेत ! ... सत्यमय प्रकाशरूपा, पावन प्रेमरूपा, दिव्य गुरुदेवा ! माझ्या हृदयाच्या खोल खोल गाभाऱ्यांतून किती आर्ततेने मी तुला हांक मारीत आहे. तूंच आम्हांला जीवन देतोस, प्रकाश प्रदान करतोस. तूंच आमचा मार्गदर्शक आणि रक्षक, आमच्या आत्म्याचाहि आत्मदेव, जीवनाचेंहि जीवन व आमच्या अस्तित्वाचें आधारभूत कारण; तूं परम ज्ञान आहेस, निर्विकार शांति आहेस.
२८ नोव्हेंबर १९१३
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे जीवनप्रभो, अन्य कोणत्याहि वेळेपेक्षां या प्रभातकालीन एकाग्र, प्रशांत ध्यानसमयीं माझे विचार आर्त प्रार्थनेद्वारां तुझ्याप्रत अधिक वेगानें उसळून येतात.
आतां उगवणारा हा दिवस पृथ्वीसाठीं आणि तिच्यावरील मानवांसाठीं थोडा अधिक शुद्ध प्रकाश, अधिक खरी शांति घेऊन येऊं दे. तुझा आविष्कार अधिक परिपूर्ण होऊं दे; आणि तुझें मधुर नियमन अधिक स्वीकारलें जाऊं दे; मानवजातीला कांहीं उच्चतर उदात्त आणि सत्य गोष्टीचा साक्षात्कार होऊं दे; अधिक विशाल आणि गभीर प्रेम प्रसृत होऊं दे; म्हणजे दुःखद जखमा भरून निघतील. उदयोन्मुख सूर्याचा हा पहिला किरण म्हणजे आनंद आणि सुसंवाद यांचा ललकार आणि जीवनाच्या केन्द्रस्थानीं सुप्त वैभवशाली तेजाचें प्रतीक ठरूं दे.
* हे दिव्य स्वामिन्, हा दिवस म्हणजे तुझ्या दिव्य संकल्पाला केलेलें अधिक पूर्ण आत्मार्पण, तुझ्या कार्याला केलेलें अधिक सर्वांगीण आत्मदान, अधिक संपूर्ण आत्मविस्मृति, महत्तर ज्ञान आणि विशुद्ध- तर प्रेम यांची सुसंधि ठरेल अशी कृपा कर; आणि अशीहि कृपा कर कीं, अधिक आंतरिक आणि निरंतर तादात्म्य झाल्यानें आम्ही तुझ्याशी नित्य अधिकाधिक संयुक्त राहूं व तुझें योग्य सेवक होऊं. आमचा सारा अहंकार आणि क्षुद्र गर्व, लोभ आणि अपूर्ण ज्ञान यांचा निरास कर म्हणजे त्यामुळें तुझ्या दिव्य प्रेमानें प्रदीप्त होऊन आम्ही जगाचे मार्गदर्शक दीप होऊं. *
पौर्वात्त्य देशांतील सुगंधित उदबत्तीच्या धवल धूम्र - वलयाप्रमाणें माझ्या हृदयांतून एक मूक स्तवन वर वर जात आहे.
आणि सम्पूर्ण समर्पणयुक्त प्रसन्नतेनें उगवत्या दिनमणीच्या शांत मी तुला वंदन करीत आहे.
वर्ष: १९१४
२४ जानेवारी १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे नाथ, आमच्या अस्तित्वाच्या एकमेव सत्यदेवा, उदात्त प्रेमप्रभो, जीवनाच्या उद्धारका, प्रत्येक क्षणीं आणि प्रत्येक गोष्टीमध्यें तुझ्या भानाखेरीज दुसरें कोणतेंच भान मला राहूं नये.
br/>
मी ज्यावेळीं सर्वस्वीं तुझ्याच जीवनशक्तीनें संजीवित होऊन रहात नाहीं तेव्हां मला यातना होतात. हळू हळू मी विझून नाहींशी होऊं लागते; कारण माझ्या अस्तित्वाचें तूंच एकमात्र कारण, एकमेव ध्येय आणि एकमात्र आधार आहेस. स्वतःच्या पंखांवर अजून विश्वास नसलेल्या, उडण्यास धीर होत नसलेल्या चिमुकल्या भित्र्या पिलाप्रमाणें मी आहे; तुझ्याशीं निश्चित अंतिम तादात्म्य साधतां यावें म्हणून मला उंच भरारी मारतां येऊ दे.
१ फेब्रुवारी १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
मी तुझ्याकडे वळत आहे. तूं सर्वत्र विद्यमान आहेस, सर्वांतर्यामीं आहेस, सर्वांच्या बाहेर आहेस, सर्वांचें प्राणभूत असें मूलतत्त्व आहेस, पण सर्वांहून अलगहि आहेस, समस्त शक्तींचें घनीभूत केंद्रस्थान आहेस, सचेतन व्यक्तिमत्त्वांचा निर्माता आहेस. हे ज्जगदोद्धारका, मी तुझ्या सन्मुख येऊन तुला वंदन करीत आहे आणि तुझ्या दिव्य प्रेमाशी एकरूप होऊन पृथ्वी आणि पृथ्वीवरील प्राणी यांविषयीं मी विचार करीत आहे. नित्य नष्ट होऊन वारंवार नवनवीन विविध रूपें धारण करणाऱ्या मृण्मय, पार्थिव द्रव्याविषयीं आणि रचना झाल्याबरोबर विघटन होणाऱ्या प्रचंड वस्तुसंघाताविषयीं मी विचार करत आहे. अशा प्राण्यांविषयींहि मी विचार करीत आहे, जे स्वतःला सचेतन आणि स्थायी व्यक्तित्वयुक्त समजतात, पण जे वास्तविक एखाद्या वायुलहरीइतके क्षणभंगुर असतात; विविध असूनहि नेहमींच एकसारखें किंवा जवळ जवळ तेच असतात, त्याच त्या वासना, प्रवृत्ति, रुचि, तेच अज्ञानपूर्ण प्रमाद अनंतकाळ- पर्यंत पुनः पुनः ते करीत रहातात.
परंतु मधून मधून तुझा उदात्त प्रकाश एखाद्या व्यक्तीमध्यें झळकतो आणि त्या व्यक्तीद्वारां अखिल जगतामध्यें त्याची प्रभा फांकते आणि नंतर थोडीशी सूज्ञता, थोडेसें ज्ञान, थोडीशी निरपेक्ष श्रद्धा, वीरता आणि करुणा मानवी हृदयामध्यें प्रवेश करूं लागतात, त्यांचीं मनें रूपांतरित करून टाकतात आणि त्यांच्या अंध अज्ञानामुळें ज्या दुःखमय व कठोर संसारचक्रामध्यें ते सांपडलेले असतात त्यांतील कांहीं भाग मुक्त करतात.
परंतु शहरी जीवन व तथाकथित सुधारणांमुळें मनुष्यप्राणी ज्या भयंकर भ्रमामध्यें बुडून गेला आहे, त्यांतून त्याला बाहेर काढण्यासाठी पहिल्यापेक्षां कितीतरी उज्ज्वलतेची, कितीतरी आश्चर्यकारक वैभवाची व ज्ञानप्रकाशाची आवश्यकता आहे ! स्वार्थी, हीन आणि मूर्खतापूर्ण समाधानासाठीं जो कटु संघर्ष वासना करीत राहिल्या आहेत, त्यापासून त्यांना परावृत्त करून, ज्या चक्राव्यूहाच्या कपटपूर्ण चकाकीमागें मृत्यु लपून राहिला आहे,
सून त्यांना वर खेचून तुझ्या विजयदायी सुसंवादाकडे वळविण्यासाठीं किती जबरदस्त पण त्याचबरोबर दिव्य मधुर शक्तीची आवश्यकता आहे !
हे प्रभो, हे सनातन गुरो, आम्हांला प्रकाश दे, पथ-प्रदर्शन कर, तुझ्या नियमनाच्या परिपूर्तीचा, तुझें कार्य पूर्ण करण्याचा मार्ग आम्हांला दाखव.
मौन भावामध्यें मी तुझें पूजन करीत आहे आणि पावन एकाग्रतेमध्यें तुझा शब्द ऐकत आहे.
१४ फेब्रुवारी १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
शांति, समस्त पृथ्वीवर शांति !..
सर्व लोक जाणिवेच्या सामान्य अवस्थेतून सुटून, सांसारिक वस्तूंच्या आसक्तींतून मुक्त होऊन त्यांना तुझ्या दिव्य अस्तित्वाचें ज्ञान होऊं दे, तुझ्या सर्वोच्च जाणिवेशीं त्यांचें तादात्म्य होऊं दे आणि त्यामधून निर्झरणाऱ्या विपुल शांतीचा त्यांना आस्वाद घेतां येऊ दे.
परमेश्वरा! तूं आमच्या अस्तित्वाचा सार्वभौम स्वामी आहेस. तुझा दिव्य दंडक हा आमच्या जीवनाचा नियंता आहे. आणि आमच्या सर्व सामर्थ्यानिशीं आम्ही अशी तीव्र आकांक्षा धरतो कीं, तुझ्या शाश्वत चेतनेशीं आमच्या चेतनेचें तादात्म्य व्हावें, म्हणजे क्षणोक्षण आणि प्रत्येक क्रियेमध्यें तुझेंच महान् कार्य आम्ही संपादन करूं शकूं. हे नाथ, आम्हांला भावी आपत्तीच्या काळजींतून मुक्त कर. घटनांकडे, स्थूल सामान्य दृष्टीने पहाण्याच्या संवयीपासून आमची सोडवणूक कर. असें वरदान दे कीं, ज्यामुळे आम्ही यापुढें केवळ तुझ्याच दृष्टीनें पाहूं आणि तुझ्याच इच्छेनें कार्य करूं. तुझ्या दिव्य प्रेमाचे जिते-जागते प्रदीप तूं आम्हांला बनव.
आदरानें, भक्तिभावानें, माझ्या अखिल अस्तित्वाचें सानंद समर्पण करून, हे प्रभो, तुझेंच कार्य सफल करण्यासाठीं मी स्वतःला तुझ्या चरणीं समर्पित करीत आहे.
शांति, समस्त पृथ्वीवर शांति !
१५ फेब्रुवारी १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे देवाधिदेवा, एकमात्र सत्यरूपा, तूं आमच्या प्रकाशाचाहि प्रकाश आहेस आणि जीवनाचेंहि जीवन आहेस. हे परम प्रेममया, जगदोद्धारका, तुझ्या निरंतर सान्निध्याच्या जाणिवेविषयीं मी अधिकाधिक संपूर्णतया जागृत होत जावें असा मला वर दे. तुझ्याच दंडकानुसार माझीं सारी कर्मों घडूं देत; माझी इच्छा आणि तुझी इच्छा यांमध्यें मुळींच भेद राहूं नये, माझ्या मनाच्या भ्रमरूप जाणिवे- पासून व मनाच्या आभासमय, काल्पनिक जगतापासून मला मुक्त कर. माझी चेतना पूर्ण, परम चेतनेशी तादात्म्य पावूं दे; कारण ती परम चेतना म्हणजे तूंच आहेस.
ध्येयप्राप्तीच्या संकल्पामध्यें मला सातत्य प्रदान कर. सारी जडता, ग्लानि आणि शिथिलता यांना झटकून टाकणारी दृढता, शक्ति व धैर्य मला प्रदान कर.
परिपूर्ण अनासक्तीची शांति, तुझें सान्निध्य अनुभवास आणून देणारी आणि तुझी मध्यस्थी फलदायी करणारी शांति, प्रत्येक दुष्ट इच्छा आणि सारी अंधःकारमय दुर्बोधता यांच्यावर सदा विजयी होणारी शांति मला दे.
हे प्रभो, माझ्या अस्तित्वांतील सर्व कांहीं तुझ्याशी एकरूप होऊन जाऊं दे; आणि तुझ्या प्रेमपूर्ण, उच्चतम कार्याविषयीं संपूर्ण जागृत होऊन मी तुझ्याच प्रेमाची केवळ एक धगधगती ज्वाला होऊन जाऊं दे, असें मी तुझ्या पायाशीं प्रार्थित आहे.
७ मार्च १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
कागा मारू जहाजावर :
अत्यंत अद्भुत रक्षणाच्या रूपानें काल तूं आमच्या सन्निध होतास; अगदीं बाह्य थरावरील अभिव्यक्तीमध्येंहि तुझ्या नियमनाचा विजय होण्यास तूं अनुमति दिलीस. हिंसेला शांतीनें आणि पाशवी वृत्तीला सौम्य वृत्तीच्या बलानें उत्तर दिलें गेलें; आणि जेथें विध्वंसक दुर्घटना घडली असती, तेथें तुझ्या शक्तीचा गौरव झाला. हे प्रभो, किती तीव्र, उत्साही कृतज्ञतेनें मी तुला, तुझ्या उपस्थितीला अभिवादन केलें! तुझ्याचकरितां व तुझ्या नांवाकरितां जगण्यास, विचार करण्यास आणि कार्य करण्यास आम्हांला सामर्थ्य मिळेल, केवळ विचारामध्यें व संकल्पामध्यें नव्हे, तर प्रत्यक्ष सर्वांगीण कार्यसिद्धीमध्येंहि आम्हांला शक्ति मिळेल, याची ती मला निश्चित खूण वाटली.
* या प्रातःसमयीं नेहमींच्याच एकच एक आकांक्षेनें माझी प्रार्थना तुझ्याकडे वर येत आहे. इतक्या शक्तिशाली आणि प्रभावी रूपामध्यें मी तुझेंच प्रेम जगावें, त्याचाच प्रकाश सर्वत्र इतका प्रसृत करावा कीं, त्यामुळे आमच्या सान्निध्यामध्यें सर्वांना सुरक्षितता, सशक्तता वाटावी, नवजीवन मिळावें, प्रकाश मिळावा. अस्वस्थ जीवन शमविण्याची, दुःख कष्ट दूर करण्याची, शांति आणि स्थिर विश्वास उत्पन्न करण्याची, यातना मिटवून त्यांच्या जागीं खऱ्या एकमेव सुखाची, जें सुख नेहमीं तुझ्यामध्यें निवास करतें आणि जें कधीं कोमेजत नाहीं, अशा सुखाची, आनंदाची भावना प्रस्थापित करण्याची शक्ति मिळावी म्हणून... हे प्रभो, अद्भुत सुहृदा, सर्वशक्तिमान् गुरुदेवा, आमच्या समस्त अस्तित्वामध्यें प्रविष्ट हो. केवळ तूंच त्यामध्यें निवास करशील आणि त्याच्याद्वारां केवळ तुझाच आविष्कार होईल इतकें त्याचें सर्वांगीण परिवर्तन कर. *
*टीप: हा उतारा श्री अरबिंदो यांनी फ्रेंचमधून इंग्रजीत अनुवादासाठी निवडला होता.
८ मार्च १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
ज्यावेळीं समोरील प्रशांत सूर्योदयामुळे माझ्या अंतरंगामधील सर्वकाही शांत आणि नीरव झाले होतें, ज्यावेळीं मी तुझ्याविषयीं जागृत झालेली होतें आणि माझ्यामध्यें केवळ तूंच निवास करीत होतास, त्या क्षणी हे परमेश्वरा, मला असें वाटलें कीं, या जहाजा- वरील सर्व व्यक्तींना माझ्यामध्यें धारण करून, समान अशा प्रेमानें त्यांना मीं आवरण घातलेलें आहे, आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येकामध्यें तुझ्या चेतनेचा कांहीं अंश उदित होईल. तुझ्या दिव्य शक्तीचा आणि अजिंक्य प्रकाशाचा इतक्या तीव्रतेनें मला पूर्वी फार वेळां अनुभव आलेला नव्हता; आज पुनश्च एकदां माझा आत्मविश्वास सर्वांगीण झाला आणि माझें सानंद समर्पण विशुद्ध झालें.
हे परमेश्वरा, तूं सकलदुःखहर्ता, समस्त तिमिरनाशक आणि परम शोकनिवारक आहेस. या जहाजामध्यें ज्यांनी आश्रय घेतलेला आहे, त्या सर्वांच्या हृदयामध्यें तूं नित्य-निरंतर उपस्थित रहा, म्हणजे त्यामुळें तुझें वैभव पुनश्च एकदां प्रकट होईल.
९ मार्च १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
जे लोक तुझ्याचकरितां आणि तुझ्याचमध्यें जीवन जगतात, त्यांची भौतिक परिस्थिति, त्यांच्या संवयी, हवामान, त्यांचें परिसर बदललें तरी ते सर्वत्र एकच वातावरण अनुभवतात, ते जेथें जातील तेथें स्वतः मध्यें तें वातावरण घेऊन जातात; त्यांचा विचार नित्य- निरंतर तुझ्यावर केंद्रित झालेला असतो; त्या विचारामध्येंहि सर्वच ठिकाणीं त्यांना आपल्या घरच्यासारखें वाटतें; कारण सर्वत्र ते तुझ्याच सदनामध्यें असतात. नवीन वस्तु आणि नवीन देश यांच्यातील नावीन्य, अदृष्टपूर्वता किंवा चित्रविचित्रता पाहून त्यांना आश्चर्य वाटत नाहीं; कारण त्यांना प्रत्येक वस्तूमध्यें, सर्वांच्या ठिकाणीं तुझ्याच अस्तित्वाचा साक्षात्कार होतो, आणि तुझें सदा अनुभवास येणारें शाश्वत वैभव रेतीच्या लहानशा कणांतहि दृष्टीस पडतें. सर्व पृथ्वी तुझें स्तुतिगान करीत आहे; अंधःकार, दुःख आणि अज्ञान असूनहि, या सर्वांच्या मधूनहि तुझ्याच प्रेमाचें वैभव आम्ही पाहूं शकतो आणि त्याच्याशीं अविरत आंतरिक संबंध अनुभवूं शकतो.
हे प्रभो, मधुर स्वामी, हा सर्व अनुभव मला या जहाजावर एकसारखा येत आहे. ज्या अवचेतनेची निष्क्रियता जिंकून तुझ्या दिव्य उपस्थितीची जागृति तेथें आणावयाची आहे, त्या अवचेतनेच्या लाटांवर, तुझ्या वैभवाची ग्वाही देण्यासाठीं तरंगत असलेलें जणुं मंदिर म्हणजेच हें जहाज आहे, किंवा अद्भुत शांतीचें तें एक धाम आहे असें मला वाटत आहे.
हे अनिर्वचनीय सनातना, मी ज्या दिवशीं तुला जाणलें, तो दिवस खरोखर किती भाग्याचा !
पण सर्व दिनांमध्यें तो दिन सर्वांत सुभाग्याचा ठरेल, जेव्हां शेवटीं अखिल पृथ्वीच जागृत होऊन, तुला जाणून घेईल आणि केवळ तुझ्याचस्तव जगेल.
२५ मार्च १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
नेहमीप्रमाणेंच निःशब्द आणिअदृश्यपणें पण सर्वशक्तिमानतेनें तुझ्या कार्याचा प्रभाव पडला आणि या मिटलेल्या, बंद भासणाऱ्या जीवात्म्यामध्यें तुझ्या दिव्य प्रकाशाची जाणीव जागृत झाली. मला हें माहीत होतेंच कीं, कोणीहि तुझ्या दिव्य सान्निध्यासाठीं आर्त इच्छा केली, तर ती विफल होणें अशक्य आहे. आणि जर अगदीं अंतःकरणपूर्वकतेनें आम्ही तुझ्याशीं आंतरिक संबंध प्रस्थापित केला मग ही गोष्ट वैयक्तिक शरीर वा व्यक्तिसमूह, कोणाच्या का द्वारां होईना - तर त्या व्यक्तीच्या ठिकाणीं अज्ञानांधःकार असूनहि तिच्या अवचेतनेचें रूपांतर झालेलें दिसून येतें. पण जेव्हां तिच्या एका अथवा अधिक अंगांमध्यें हें रूपांतर - कार्य जाणीवपूर्वक घडून येतें, राखेखालीं दडून राहिलेल्या अग्नीची ज्वाला एकाएकी उफाळून वर येते आणि अखिल अस्तित्वाला उजळून टाकते, तेव्हां तुझ्या त्या सार्वभौम कार्यासमोर आम्ही सहर्ष नतमस्तक होतो, तुझ्या अकुंठित सामर्थ्याचा प्रत्यय पुनः आम्हांला येतो आणि मानवाला भविष्यकाळीं खरेंखुरें सुख मिळण्याच्या आणखी एका नवीन शक्यतेची भर पडली आहे अशी न्याय्य आशा आम्ही बाळगूं शकतो.
हे परमेश्वरा, सतत दुःख भोगत असलेल्या मानवतेस तूं प्रकाशदान देतोस, तिचें रूपांतर घडवितोस, तिला गौरवास चढवितोस आणि ज्ञानोत्पन्न अशी शांति तूं तिला प्रदान करतोस. त्या मानवतेची कृतज्ञता व्यक्त करणारी, धन्यवाद - भावोर्मि माझ्यांतून उठून ती तुजप्रत वर वर येत राहिली आहे.
१० एप्रिल १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
अचानक पडदा वर उचलला गेला; क्षितिज धवळले. सुस्पष्ट प्रकाशांत, कृतज्ञतेचें भरतें येऊन माझ्या अस्तित्वानें, तुझ्या चरणीं लोटांगण घातलें. गभीर आणि सर्वांगीण आनंद झालेला असूनहि सर्वकांहीं निश्चल होतें. सर्वकांहीं अनंततेच्या शांतीनें शांतिमय झालेलें होतें.
कोणत्याहि मर्यादा मला राहिलेल्या नाहींत असें भासत आहे; देहभान आतां उरलेलें नाहीं. संवेदना नाहींत, भावना नाहींत, विचार नाहींत... प्रेम आणि प्रकाश यांत न्हाऊन गेलेली, अनिर्वचनीय अत्यानंदानें तुंडुब भरलेली, स्वच्छ, पवित्र आणि निश्चल असीम विशालता हीच काय ती तेथें असून, तेंच केवळ माझें स्वरूप आहे असें मला भासत आहे, आणि हे प्रभो, आमच्या सर्वोत्तम भाग्यविधात्या, 'मी' मध्यें पूर्वीच्या संकुचित आणि स्वार्थी 'मी'चा इतका थोडा अंश आहे कीं, त्यामुळे ही 'मी' आहे कां तूंच आहेस हेंच मला सांगणें अशक्य झालें आहे.
जणुं कांहीं हें सर्व म्हणजे केवळ शक्ति, धैर्य, सामर्थ्य, इच्छाबल, अनंत माधुरी आणि अनुपम करुणा...
गेल्या कांहीं दिवसांपेक्षां अधिक जोरानें भूतकाळ पुसला गेला आहे, मृत झाला आहे, नूतन जीवनाच्या किरणांखालीं जणुं कांहीं पुरला गेला आहे. या वहीचीं कांहीं पानें चाळत असतांना मागें सहज ओझरतां दृष्टिक्षेप टाकला असतां, या भूतकाळाच्या मृत्यूबद्दल माझी पुरेपूर खात्री झाली आणि मोठा भार कमी झाल्यानें हलकें वाटून, तुझ्यापुढें, माझ्या दिव्य प्रभूपुढें मी बालकाच्या निरागसतेनें, अत्यंत सरलतेनें, आडपडदा न ठेवतां उभी राहिली आहे... आणि अजूनहि एकच एक कोणती गोष्ट अनुभवाला येत असेल, तर ती म्हणजे निश्चल आणि पवित्र असीमता...
परमेश्वरा, तूं माझी प्रार्थना ऐकलीस, तुझ्याजवळ मीं जें मागितलें तें तूं मला दिलें आहेस; 'मी' लुप्त झाला आहे; केवळ तुझ्याच सेवेस वाहिलेलें विनीत साधन राहिलेलें आहे. तुझ्या अनंत व शाश्वत किरणांना एकीकृत करणारें आणि अभिव्यक्त करणारें केन्द्रस्थान फक्त राहिलेलें आहे. माझें जीवन हातीं घेऊन तें तूं तुझेंच केलें आहेस; माझी इच्छाशक्ति घेऊन ती तुझ्या इच्छाशक्तीश जोडली आहेस; माझें प्रेम घेऊन तें तूं तुझ्या प्रेमाशी एकरूप केलें आहेस; माझा विचार हातीं घेऊन त्याच्या जागीं तुझी केवल चेतना तूं भरली आहेस.
हा आश्चर्यमग्न देह आपलें मस्तक विनम्र करून मौनयुक्त विनीत भक्तिभावानें तुझ्या चरणधूलीस स्पर्श करीत आहे. निर्विकार शांतीमध्यें विलसणाऱ्या तुझ्याखेरीज दुसरें कांहींहि अस्तित्वांत उरलेलें नाहीं.
१७ एप्रिल १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
पांडिचेरी :
हे नाथ, हे सर्वसमर्थ प्रभो, एकमेव सद्वस्तुरूपा, असें वरदान दे कीं, कोणत्याहि तऱ्हेची चूक, कसलाहि अंधःकार किंवा कसलेंहि अशुभकर अज्ञान माझ्या हृदयामध्यें आणि माझ्या विचारांमध्यें न कळत शिरणार नाहीं.
कृतीमध्यें व्यक्तित्व हें तुझ्या संकल्पाचें आणि तुझ्या शक्तीचें अनिवार्य व अत्यावश्यक असें साधन आहे. हें व्यक्तित्व जितकें अधिक बलवान्, बहुमुखी, सामर्थ्यशाली, सुघटित आणि सचेतन असेल, तितक्या अधिक सामर्थ्यानें आणि अधिक उपयुक्ततेनें तें वापरलें जाईल. पण व्यक्तित्व घटित होण्यानें साहजिकच, आपलें अस्तित्व पृथक् आहे असें वाटण्याकडे, अशा अनिष्ट भ्रमामध्यें पडण्याकडें तें झुकतें; आणि हळू हळूं, तूं आणि ज्यावर तूं कार्य करूं इच्छितोस तें, यांच्या दरम्यान येणारा एक पडदा असें स्वरूप त्याला येतें. आविष्काराच्या अगदी सुरुवातीला नव्हे, तर ज्यावेळीं सर्व शक्ती तुझ्याकडे परत आणावयाच्या असतात त्यावेळीं हें व्यक्तित्व पडद्याप्रमाणें बनतें; म्हणजेच तुझें जें न्याय्य असेल, तें- तुझ्या कार्याला प्रत्युत्तर म्हणून ज्या कांहीं शक्ती परत आल्या असतील त्या — योग्य तऱ्हेनें तुझ्याकडे परत आणणारा विश्वासू, सेवक किंवा मध्यस्थ असें स्वरूप त्या व्यक्तित्वाचें रहात नाहीं, तर त्या शक्तींचा कांहीं भाग आपल्या स्वतःसाठीं वगळून ठेवण्याची एक प्रवृत्ति त्यामध्ये रहातें; “हें नाहींतरी 'मींच' केलें आहे, किंवा याबद्दल लोक माझी प्रशंसा करीत आहेत"... ही भावना त्यांत रहाते. हे घातक भ्रमा, हे अंधःकारमय असत्या, आतां तूं सांपडला आहेस, आतां तुझ्यावरचा बुरखा गळून पडला आहे. कर्माचें फल आंतून पोखरणारा, कर्माचे सर्व परिणाम निष्फळ बनविणारा हाच तो अपायकारक किडा.
हे नाथ, हे मधुर स्वामी, अद्वितीय सद्-वस्तुरूपा, हा 'मी'पणाचा भाव नाहींसा कर. मला आतां हें कळून चुकले आहे की, जोपर्यंत म्हणून हें सृष्ट विश्व राहील, तोपर्यंत तुझ्या आविष्कारासाठीं 'मी' हा आवश्यक राहील; त्याचा विलय करणें किंवा त्याला नुसतें कमी करणें किंवा तो दुर्बल बनविणें म्हणजे अंशतः किंवा पूर्णतः तुझ्या आविष्काराचें साधन तुझ्यापासून हिरावून घेण्यासारखें आहे. पण 'मी' म्हणजे एक पृथक् अस्तित्व आहे हा जो भ्रामक विचार आहे, ही जी भ्रामक भावना आहे, भ्रामक संवेदना आहे ती मात्र समूळ आणि कायमची उखडून टाकली पाहिजे. कोणत्याहि क्षणीं, कोणत्याहि परिस्थितीमध्यें आम्हीं हें विसरतां कामां नये कीं, तुझ्या बाहेर, तुझ्या व्यतिरिक्त या 'मी' ला कांहीहि अस्तित्व नाहीं.
हे परम प्रिय भगवान्, हे दिव्य स्वामी, माझ्या हृदयामधून हा भ्रम, ही माया दूर कर, म्हणजे तुझी सेविका शुद्ध आणि विश्वासु बनेल आणि तुझ्याकडे जें जें काय परत यायलाच पाहिजे आहे तें ती प्रामाणिकपणें आणि सम्पूर्णपणें घेऊन येईल. निश्चल नीरवते - मध्यें या परम अज्ञानावर मला चिंतन करतां येऊं दे आणि त्याचें स्वरूप समजावून घेऊन त्याला कायमचें नष्ट करतां येऊं दे. माझ्या हृदयामधून छायेला, अंधःकाराला हांकलून दे आणि तुझा प्रकाश, सर्वतंत्र स्वतंत्र सम्राटाप्रमाणें निर्वेध राज्य करूं दे.
१२ मे १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
मला अधिकाधिक असें वाटूं लागलें आहे कीं, साधनेच्या अशा एका कालखंडांत आम्ही आलों आहोंत कीं, ज्यामध्यें भूतकालीन प्रयत्नांचें फल दिसूं लागलें आहे; असा एक कालखंड कीं, ज्यावेळीं तुझ्या नियमनाचें आमच्या अस्तित्वावर जितक्या प्रमाणांत प्रभुत्व आलें असेल, तितक्या प्रमाणांत आम्ही तुझ्या नियमनानुसार वागतों, पण त्या नियमनाविषयीं जागृत होण्याइतकाहि अवकाश आम्हांला नसतो.
आज सकाळीं जलद गतीनें अनुभव घेत घेत, एकाहून एक खोल अशा पातळीवर मी गेलें असतांना नेहमीप्रमाणें पुनः एकदां माझी जाणीव तुझ्या जाणिवेशी एकरूप करूं शकलें, आणि केवळ तुझ्याच मध्यें निवास करूं शकलें; - वास्तविक तूंच एक माझ्याद्वारें निवास करीत होतास, पण लगेच तुझ्या संकल्पशक्तीनें माझी जाणीव बाहेर खेचली, जें कार्य साध्य करावयाचें आहे त्याकडे खेचली आणि तूं मला म्हणालास : " मला ज्याची आवश्यकता आहे असें साधन तूं हो.” आणि हाच परमोच्च अंतिम त्याग नाहीं कां ? तुझ्याशीं झालेलें तादात्म्य दूर करावयाचें, तुझ्या आणि माझ्यामध्यें भेदच न राहिल्यामुळे होणारा जो मधुर, शुद्ध आनंद त्याचा त्याग करावयाचा, केवळ बुद्धीनें नव्हे, तर समग्र अस्तित्वाच्या अनुभवामुळें प्रत्येक क्षणीं हें जाणण्याचा जो आनंद होतो कीं तूंच एकमेव अनुपम सद्वस्तु आहेस आणि अन्य सर्वकांहीं केवळ देखावा, माया आहे, त्या आनंदाचाहि त्याग करावयाचा. हें निःसंशय आहे कीं, बाह्य अस्तित्वानें तुझें विनम्र साधन व्हावें. मग त्याला प्रेरणा देणाऱ्या इच्छाशक्तीची जाणीव त्यानें करून घेण्याचीहि आवश्यकता नाहीं; पण जवळ जवळ पूर्णतः मी या साधनाशी काय म्हणून एकरूप होऊन जावें? त्याऐवजीं माझा 'अहं' तुझ्यामध्यें सर्वस्वीं विलीन होऊन, तुझ्या पूर्ण, केवल जाणिवेमध्यें कां राहूं नये ?
मी विचारत आहे पण त्याची मला चिंता अशी नाहीं. मला माहीत आहे कीं, तुझ्याच इच्छेप्रमाणें सर्वकांहीं घडत आहे; आणि विशुद्ध पूजनभावानें मी मला स्वतःला आनंदानें तुझ्याच इच्छेच्या स्वाधीन करीत आहे. हे प्रभो, मी जसें व्हावें असें तुला वाटत असेल, तसें मी होईन; पाहिजे तर जागृत, पाहिजे तर अजागृत; हे शरीर आहे त्याप्रमाणें एक साधेसुधें साधन किंवा तूं स्वतः आहेस त्याप्रमाणें परम ज्ञान मी होईन. खरेंच, तो आनंद किती मधुर आणि शांतिमय असतो, जेव्हां असें म्हणतां येतें कीं, "सर्वच चांगलें आहे". आणि जेव्हां याचा अनुभव घेतां येतो कीं, तुझें वाहन होण्याचें ज्यांनीं ज्यांनीं स्वीकारलें आहे, त्या सर्वांच्याद्वारां तूंच या जगामध्यें कार्य करीत आहेस.
तूंच सर्वांचा सर्वोच्च स्वामी आहेस, तूं अगम्य, अज्ञेय, शाश्वत आणि परात्पर सद्वस्तु आहेस.
हे आश्चर्यमय एकत्वा, मी तुझ्यामध्यें विलीन होत आहे.
२१ मे १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
समस्त अभिव्यक्तीच्या बाहेर, शाश्वततेच्या अक्षय्य निश्चल नीरवतेमध्यें मी तुझ्यामध्यें आहे. हे भगवान्, हे अचल परमानंदा, तुझी शक्ति आणि तुझा अद्भुत प्रकाश यांतून ज्या जड तत्त्वाच्या परमाणूंचें केन्द्र आणि त्यांचें वास्तविक अस्तित्त्व घटित झालें आहे, त्या परमाणूंमध्येंहि मला तूंच सांपडतोस; अशा रीतीनें तुझ्या दिव्य सान्निध्याचा त्याग न करतांहि तुझ्या परा चेतनेंत मी विलीन होऊं शकतें; किंवा माझ्या अस्तित्वाच्या उज्ज्वल कणांकणांमध्यें मी तुला पाहूं शकतें. आणि या क्षणाला तरी तुझें जीवन आणि तुझी प्रभा यांची हीच परिसीमा आहे.
मी तुला पहात आहे, मी 'तूंच' बनून गेलें आहे आणि या दोन ध्रुवांमध्यें माझें प्रेम तीव्र अभीप्सेनें तुझ्याकडे येत आहे.
२२ मे १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
अस्तित्वाच्या सर्व अवस्थांमध्ये आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्यें जेव्हां आम्ही क्रमशः असत्यापासून सत्य वेगळें करतो आणि जेव्हां आम्ही एकमेव सद्वस्तूच्या परिपूर्ण आणि सर्वांगीण निश्चयात्मक अनुभूतिप्रत येऊन पोंचतों, तेव्हां या परात्पर चेतनेच्या उच्चतम शिखरावरून आम्ही आमची दृष्टि खालीं आणून ती, पृथ्वीवरील तुझ्या आविष्काराचें तात्कालिक साधन होणाऱ्या या संकीर्ण व्यक्ति- साधनाकडे वळविली पाहिजे; आणि त्यामध्यें केवळ तुलाच - आमच्या अस्तित्वाच्या एकमेव सत्यरूप अशा केवळ तुलाच - पाहिलें पाहिजे. अशा रीतीनें व्यक्तिरूप अस्तित्वाच्या अणु-समूहांतील प्रत्येक अणु जागृत होऊन, तुझा महान् प्रभाव ग्रहण करूं शकेल; अस्तित्वाच्या केवळ मध्यवर्ती चेतनेंतूनच नव्हे, तर त्याच्या बाह्यतम प्रकटीकरणांतूनहि अज्ञान व अन्धःकार नाहींसा होऊन जाईल. परिवर्तनाचे हे महान् प्रयास जेव्हां फलद्रूप आणि परिपूर्ण होतील, तेव्हांच केवळ तुझ्या सत्तेची, तुझ्या प्रकाशाची आणि तुझ्या प्रेमाची सम्पन्नता परिपूर्णतेनें अभिव्यक्त होऊं शकेल.
आम्ही एकमेव सद्वस्तूच्या परिपूर्ण आणि सर्वांगीण निश्चयात्मक अनुभूतिप्रत येऊन पोंचतों, तेव्हां या परात्पर चेतनेच्या उच्चतम शिखरावरून आम्ही आमची दृष्टि खालीं आणून ती, पृथ्वीवरील तुझ्या आविष्काराचें तात्कालिक साधन होणाऱ्या या संकीर्ण व्यक्ति- साधनाकडे वळविली पाहिजे; आणि त्यामध्यें केवळ तुलाच - आमच्या अस्तित्वाच्या एकमेव सत्यरूप अशा केवळ तुलाच - पाहिलें पाहिजे. अशा रीतीनें व्यक्तिरूप अस्तित्वाच्या अणु-समूहांतील प्रत्येक अणु जागृत होऊन, तुझा महान् प्रभाव ग्रहण करूं शकेल; अस्तित्वाच्या केवळ मध्यवर्ती चेतनेंतूनच नव्हे, तर त्याच्या बाह्यतम प्रकटीकरणांतूनहि अज्ञान व अन्धःकार नाहींसा होऊन जाईल. परिवर्तनाचे हे महान् प्रयास जेव्हां फलद्रूप आणि परिपूर्ण होतील, तेव्हांच केवळ तुझ्या सत्तेची, तुझ्या प्रकाशाची आणि तुझ्या प्रेमाची सम्पन्नता परिपूर्णतेनें अभिव्यक्त होऊं शकेल.
तुझ्या जीवनशक्तीशिवाय, तुझ्या प्रकाशाशिवाय, शिवाय या विश्वामध्यें दुसरें कांहींहि नाहीं.
तुझ्या दिव्य सत्याच्या ज्ञानानें सर्वकांहीं उज्ज्वलित आणि परिवर्तित होऊं दे.
तुझ्या दिव्य प्रेमाची माझ्या अस्तित्वामध्यें भरती आली आहे; प्रत्येक पेशीमध्यें तुझा परमोच्च प्रकाश झगझगत आहे; तुझें ज्ञान
झाल्यामुळें आणि तुझ्याशीं एकत्व पावल्यामुळे सर्वच कांहीं प्रमुदित, उल्हसित झालें आहे.
२६ मे १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
पृष्ठभागावर आहे तुफान, समुद्र प्रक्षुब्ध आहे, लाटा एकमेकींवर आदळत आहेत आणि प्रचंड गर्जना करीत फुटत आहेत. पण या खवळलेल्या पाण्याखालीं सदा सर्वदा निश्चल, प्रशांत, हास्यपूर्ण विशालता पसरलेली आहे. पृष्ठभागावर चाललेली खळबळ ही एक अनिवार्य क्रिया आहे, या दृष्टीनें ती विशालता त्याकडे पहात आहे; कारण परिपूर्णतया दिव्य प्रकाश अभिव्यक्त करण्यास जडतत्त्व समर्थ व्हावयाचें असेल, तर जडतत्त्वाचें जोरजोरानें मंथन झालेंच पाहिजे. संत्रस्त बाह्य रूपामागें द्वंद्व आणि दारुण संघर्ष यांपाठीमागें, चेतना ही स्वस्थानीं दृढतापूर्वक स्थित आहे; ती बाह्य अस्तित्वाच्या सर्व हालचालींचें निरीक्षण करीत आहे; ती त्यांची लीला अगदींच नाटकी होऊं नये म्हणून त्यांची दिशा आणि स्थान यांत सुधारणा करण्यासाठींच केवळ हस्तक्षेप करीत आहे. हा हस्तक्षेप कधीं दृढ आणि थोडा कठोर, तर कधीं उपरोधिक असतो, त्या हालचाली योग्य स्थितीवर याव्यात म्हणून आवाहन या स्वरूपांत कधीं असतो, तर कधीं उपहासदर्शक असतो; पण त्यांत नेहमींच एक समर्थ, मधुर, प्रशांत आणि सस्मित करुणा भरलेली असते.
निश्चल नीरवतेमध्यें मी तुझा अनंत आणि शाश्वत आनंद पाहिला.
अजूनहि जे अंधारांत आणि संघर्षात पडलेले आहे, त्यांतून एक प्रार्थना तुझ्याकडे हळूहळू वर वर चढत आहे – “हे परम प्रिय स्वामी, परम प्रकाशदायका, चरम शुद्धिदायका, असें वरदान दे कीं, इतःपर सर्व जड पदार्थ व प्रत्येक क्रिया ही केवळ तुझ्याच दिव्य प्रेमाची आणि सर्वोच्च आत्म- प्रसन्नतेची निरंतर अभिव्यक्ति होईल.
माझ्या हृदयांत तुझ्या सर्वोत्तम महिम्याचें गान निनादत आहे.
२७ ऑगस्ट १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
प्रत्येक कृतीमध्यें, अस्तित्वाच्या प्रत्येक क्षेत्रामध्यें, दिव्य प्रेम बनण्यासाठीं तेंच शक्तिशाली, अनंत अगाध प्रेम बनण्यासाठीं, हे भगवान्, मी तुझ्यापाशीं आर्ततेनें याचना करीत आहे. याच दिव्य प्रेमानें, शक्तिशाली, अनंत, अगाध प्रेमानें माझ्या सर्व क्रियाकलापां- मध्यें आणि अस्तित्वाच्या सर्व क्षेत्रांमध्ये मी प्रज्वलित होऊन जाऊं दे. अशा प्रज्वलित अग्निकुंडामध्यें माझें रूपांतर होऊं दे कीं ज्याच्या ज्वालांमुळें पृथ्वीचें सर्व वातावरण शुद्ध होऊन जाईल.
खरेंच, अनंततया तुझेंच प्रेम बनून जाणें !...
३१ ऑगस्ट १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
या भीषण अव्यवस्थेमध्यें आणि भयंकर विध्वंसामध्यें एक महान् कार्य, एक प्रकारच्या नवीन बीजारोपणासाठीं पृथ्वीची तयारी करण्याचें अत्यावश्यक कार्य चाललेले दिसून येत आहे. या बीजा- रोपणाचा परिणाम म्हणजे त्याला धान्याचीं अद्भुत् कणसें लटकतील आणि जगाला एका नवीन मानववंशाच्या स्वरूपांत उत्कृष्ट, सतेज पीक प्राप्त होईल... हें भविष्यदर्शन सुस्पष्ट आणि निःसंदिग्ध असें आहे. तुझ्या दिव्य नियमनाचा मार्ग इतक्या स्पष्ट रीतीनें रेखाटलेला आहे कीं, शांति पृथ्वीवर परत येऊन, कार्यकर्त्यांच्या हृदयामध्यें साम्राज्ञीच्या स्वरूपांत प्रतिष्ठित झाली आहे. आतां संदेह किंवा अनिश्चितता, क्लेश किंवा अधीरता राहिलेली नाहीं. वरवर परिस्थिति विरोधी दिसत असली तरी, आणि मार्गांत भुरळ पाडणारी वळणें असली तरीहि त्यांचा विरोध असूनहि, त्यांना न जुमानतां आतां कार्याच्या महान् सरळ मार्गावर निरंतर कार्यसिद्धि होत चाललेली आहे. अनंत निर्मितीमधील एखाद्या क्षणाप्रमाणे असणाऱ्या स्थूल भौतिक जगांतील व्यक्ति - सत्तांना, शक्तींना हें माहीत आहे कीं, तात्पुरते, बाह्य परिणाम कांहीहि दिसत असले तरी त्यांच्यामुळें मानवतेचें एक पाऊल निश्चित पुढेंच पडणार आहे; आणि त्याचें अटळ, अनिवार्य परिणाम खात्रीनें घडून येणार आहेत. हे सनातन प्रभो, या सर्व सत्ता तुझ्याशी एकरूप होत आहेत. हे विश्वजननी, या सर्व शक्ती तुझ्याशीं संयुक्त होत आहेत; समस्त अभिव्यक्ति म्हणून जी आहे व तिच्या पलीकडेंहि जें आहे, त्याच्याशीं, विश्वमयाशीं आणि विश्वातीताशीं दुहेरी तादात्म्य प्राप्त करून घेऊन, या शक्ती अशा रीतीनें परिपूर्ण निश्चिततेच्या असीम अनंत आनंदाचा उपभोग घेत आहेत.
शांति, शांति, सर्व विश्वामध्यें शांति...
युद्ध हा एक केवळ देखावा आहे,
प्रक्षोभ हा एक भ्रम आहे.
शांति, अक्षर शांति विद्यमान आहे.
हे माते, प्रेमळ माते, मी तर 'तूंच' आहे. तूं एकाच वेळीं संहारकारिणी आणि सृजनकारिणी आहेस.
अखिल विश्व आपल्या अगणित जीवनधारांसहित तुझ्या हृदयामध्यें निवास करीत आहे आणि तूं तुझ्या विशालतेसह विश्वाच्या लहानांत लहान अणुपरमाणूंमध्येंहि वास्तव्य करीत आहेस.
जें अजून प्रकट दशेस आलेलें नाहीं, त्याच्याकडे तुझ्यांतील अनंत व्यक्तींची अभीप्सा वळत आहे आणि ते अधिकाधिक पूर्ण समग्र रूपानें प्रकट व्हावें म्हणून त्याला आवाहन करीत आहे.
सर्वकांहीं आहे; व्यक्तिगत, विश्वगत आणि अनंत अशा त्रिविध आणि त्रिकालदर्शी अखंड चेतनेमध्यें आणि एकाच वेळीं सर्वकांहीं आहे.
१ सप्टेंबर १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे भगवती माते, किती उत्कटतेनें, किती ज्वलंत प्रेमानें मी तुझ्या समीप आलें ! तुझ्या प्रगाढ चेतनेमध्यें, परमोच्च प्रेम आणि परिपूर्ण आनंद यांनी युक्त अशा उच्च स्थितीमध्यें मी तुझ्याकडे आलें व मी तुझ्या बाहुपाशांत इतकी बिलगलें आणि इतक्या तीव्रतेनें तुझ्यावर गाढ प्रेम केलें कीं, मी संपूर्णतः 'तूंच' होऊन गेलें, आणि नंतर 'आपल्या' नीरव अत्यानंदाच्या त्या शांतीमधून, निःस्तब्धतेमधून त्याहूनहि अधिक गभीरतेंतून वर येणारी एक वाणी ऐकूं आली. ती वाणी म्हणाली : "तुझ्या प्रेमाची ज्यांना आवश्यकता आहे अशा सर्वांकडे तूं वळ.” आणि चेतनेचे सर्व स्तर, विविध जगतांची परंपरा समोर प्रकट झाली. त्यांतील कांहीं जगतें वैभवपूर्ण आणि प्रकाशमान, सुव्यवस्थित आणि सुस्पष्ट होती; तेथील ज्ञान तेजःपूर्ण होतें; तेथील अभिव्यक्ति सुसंवादमय आणि विशाल होती; तेथील संकल्पशक्ति बलशाली आणि अदम्य होती. त्यानंतरची सर्व जगतें क्रमाक्रमानें अधिकाधिक विसंवादपूर्ण अस्ताव्यस्ततेमध्यें अंधःकाराने भरून गेलीं, तेथील महान् शक्ति दुर्दमनीय झाली आणि जड जगत् तमसावृत आणि दुःखमय झालें. त्यानंतर जेव्हां आम्ही दोघांनी आमच्या अनंत प्रेमानें अज्ञानमय आणि दुःखपूर्ण जगाच्या भयंकर यातना पाहिल्या, जेव्हां आम्ही पाहिलें कीं, आमची बालकें घनघोर संघर्षामध्यें हतबल झालेलीं आहेत, गुंतलेलीं आहेत, आपल्या खऱ्या ध्येयापासून च्युत झालेल्या शक्तींच्या हातांतील साधनें होऊन एकमेकांवर तुटून पडत आहेत, तेव्हां 'आम्ही' अगदीं आर्ततेनें, तीव्रतेनें अशी इच्छा केली कीं, भगवंताच्या प्रेमाचा प्रकाश प्रकट होऊं दे; या उन्मत्त, प्रक्षुब्ध शक्तींच्या केन्द्रस्थानीं रूपांतरकारी शक्ति आविर्भूत होऊं दे... नंतर आमची संकल्पशक्ति आणखी सबल आणि प्रभावी व्हावी म्हणून 'आम्ही', हे अचिंत्य परात्परा, तुझ्याकडे वळलों आणि तुझ्या सहाय्याची 'आम्ही' याचना केली आणि मग अज्ञाताच्या अगाध अशा गभीरतेमधून उदात्त व दुर्दम्य असा जो प्रतिसाद आला, त्यामुळें 'आम्हांला' समजलें कीं, पृथ्वीचा उद्धार झाला आहे.
२५ सप्टेंबर १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे परम पूज्य भगवती माते, तुझें सहाय्य असतांना काय अशक्य आहे ? सिद्धीची घटिका जवळ आली आहे; आणि तूं आश्वासन दिलें आहेस कीं, आम्हांला भगवत् इच्छेची सर्वांगीण परिपूर्ति करतां यावी म्हणून तुझें सहाय्य तूं आम्हांला देशील.
अचिंत्य सद्वस्तु आणि भौतिक जगांतील सापेक्ष वस्तुतत्त्वें यांच्यांतील मध्यस्थ या नात्यानें योग्य साधनें म्हणून तूं आम्हांला स्वीकारलें आहेस; आमच्यामध्यें तुझें सततचें सान्निध्य ही तर तुझ्या सक्रिय सहकार्याची खूण आहे.
भगवंतानें संकल्प केला आहे आणि तूं तो कार्यान्वित करीत आहेस.
एक नूतन प्रकाश या अवनीवर उदित होईल.
एक नूतन जगत् जन्म घेईल.
आणि ज्या गोष्टींचें अभिवचन दिलें होतें त्यांची परिपूर्ति केली जाईल
* 29 मार्च 1956 रोजी माताजींनी ते बदलून पुढीलप्रमाणे लिहिले :
हे परमेश्वरा, तुझी इच्छा होती आणि मी ती पूर्ण करत आहे.
पृथ्वीवर एक नवीन प्रकाश उदयास येत आहे.
एका नवीन जगाचा जन्म झाला,
आणि ज्या गोष्टींचे वचन दिले होते ते पूर्ण केले आहे.
२८ सप्टेंबर १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे परमेश्वरा, तुझ्या उपस्थितीचें गुणगान करण्यास माझी लेखणी मूक झाली आहे; तरीहि आपल्या संपूर्ण साम्राज्यावर अधिकार चालविणाऱ्या सम्राटाप्रमाणें तूं आहेस, प्रत्येक प्रदेश तूं सुसंघटित, सुव्यवस्थित करीत आहेस, त्याचा विकास व वाढ करीत आहेस. झोंपलेल्यांना तूं उठवीत आहेस. तामसिकतेमध्ये बुडूं लागलेल्या लोकांना तूं क्रियाशील बनवीत आहेस. सर्वांमधून एक सुसंवाद तूं निर्माण करीत आहेस. एक दिवस असा येईल, जेव्हां हें सुसंवादाचें कार्य पूर्ण होईल आणि सबंध देश त्याच्या प्रत्यक्ष जीवनद्वारां तुझ्या दिव्य वाणीचें आणि अभिव्यक्तीचें वाहन होईल.
परंतु मध्यंतरीच्या काळांत माझी लेखणी तुझी स्तुति करण्यास मूक होऊन गेली आहे.
३० सप्टेंबर १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे भगवान्, विचारांच्या सर्व सीमा तूं तोडून टाकल्या आहेस आणि त्यामुळे आपल्या सर्व समृद्धीसह परिपूर्णता आविष्कृत झाली आहे. या परिपूर्णतेची कोणतीहि बाजू, कोणतेंहि अंग विसरावयाचें नाहीं. एकाच वेळीं त्या सर्व बाजूंची परिपूर्ति करत रहावयाची, कोणत्याच अंगाची उपेक्षा करावयाची नाहीं, आमच्या मार्गामध्यें कोणत्याहि प्रकारची सीमा किंवा बंधन येऊ द्यावयाचें नाहीं व प्रगतीला विलंब होऊं द्यावयाचा नाहीं हें आमचें कार्य आहे आणि हेंच करण्यासाठीं तूं आपला परमोच्च हस्तक्षेप करून आम्हांस सहाय्य करणार आहेस. जे जे लोक 'तूंच' झालेले आहेत, कांहीं विशिष्ट कार्यामध्यें परिपूर्णतेनें तुझा आविष्कार करीत आहेत, तेहि आमचे सहकारी होतील; कारण तुझाच तसा संकल्प आहे.
आमची दिव्य माता आमच्या बरोबर आहे आणि परात्पर अखंड चेतनेशीं आमचें एकत्व घडवून आणण्याचें - अति खोलवरच्या भागापासून
तें अत्यंत बाह्य इंद्रियजगतापर्यंत सर्वांसह एकत्व घडवून आणण्याचें - अभिवचन तिनें आम्हांस दिलें आहे; आणि या सर्व क्षेत्रांत अग्निदेव आम्हांला आश्वासन देत आहे कीं, आपल्या शुद्धिकर ज्वालांच्या द्वारां तो आम्हांला सहकार्य देईल, विघ्नें नाहीशी करील, शक्ति सामर्थ्य प्रज्वलित करील, संकल्पशक्तीला चेतवील आणि त्यामुळें अंतिम सिद्धि अधिक शीघ्रतेनें साध्य होईल. आमच्या ज्ञानाची प्रभा परिपूर्ण करण्यासाठीं इंद्रदेव आमच्या बरोबर आहे आणि दिव्य सोमदेवानें आम्हांला त्याच्या अनंत, सम्राट्, अद्भुत प्रेमामध्यें, सर्वोच्च आनंदाला जन्म देणाऱ्या प्रेमामध्यें परिवर्तित केलें आहे...
हे दिव्य मधुर जननी, शब्दातीत आणि धुंद प्रेमभरानें, असीम श्रद्धेनें मी तुला वंदन करीत आहे.
हे उज्ज्वल अग्निदेवा, तूं माझ्यामध्यें इतक्या ज्वलंत रूपानें जागृत आहेस! मी तुला आवाहन करीत आहे आणि अशी प्रार्थना करीत आहे कीं, तूं आणखी याहूनहि अधिक ज्वलंत व्हावेंस, तुझें कुंड अधिक विशाल व्हावें, तुझ्या ज्वाला अधिक शक्तिशाली आणि उंच उंच व्हाव्यात, आणि माझें समग्र अस्तित्वच एक प्रखर ज्वलन, शुद्धिकारक अग्निराशी होऊन जावें.
हे इन्द्रदेवा, मी तुझ्यासमोर आदरभाव व्यक्त करीत आहे - तूं त करीत आहे; मी तुला विनवणी करीत आहे कीं, शीं एकरूप होऊन जावेंस, माझ्या विचारांची सारी बंधनें कायमचीं तोडून टाकून, तूं माझ्यावर दिव्य ज्ञानाचा वर्षाव करावास.
* हे परम प्रेममया, मी तुला कधींच दुसरें कांहीं नांव दिलेलें नाहीं; तरीपण तूंच माझ्या अस्तित्वाचें संपूर्णतः सारतत्त्व आहेस, माझ्या अणुरेणूंत, तसेंच अनंत विश्वामध्यें आणि त्याच्या अतीतहि तूंच स्पंदित होत असल्याचा, तूंच विद्यमान असल्याचा मला अनुभव येत आहे. तूंच प्रत्येक श्वासोच्छ्वासामध्यें श्वसन करीत आहेस, प्रत्येक क्रियेच्या केन्द्रस्थानीं तूंच प्रेरक आहेस, सर्व शुभ संकल्पांच्या द्वारां प्रकाशित होत आहेस, सर्व दुःखकष्टांच्या मागे लपलेला आहेस; तुझ्यासाठींच एका असीम आराधनेचें मी संगोपन करीत आहे; ती निरंतर अधिकाधिक प्रगाढ होत जात आहे; तूं माझ्यावर अशी कृपा कर कीं, मी अखंड रूपानें 'तूंच' आहे, अशी उत्तरोत्तर अधिकाधिक खरी प्रचीति मला येईल.
आणि तूं, हे नाथ, तूं तर एकाच वेळीं हें सर्वकाही आहेस आणि आणखीहि कितीतरी अधिक आहेस. हे सर्वश्रेष्ठ अधीश्वरा, तूंच आमच्या विचारांची अंतिम सीमा आहेस, अज्ञाताच्या उंबरठ्यावर तूं आमच्यासाठीं उभा आहेस; त्या अचिंत्य अवस्थेमधून एक नवीन प्रभा आणि उच्चतर व अधिक सर्वांगीण सिद्धीची संभाव्यता निर्माण कर; म्हणजे तुझें कार्य साध्य होईल आणि परमोच्च तादात्म्याप्रत, सर्वोत्तम अभिव्यक्तीप्रत अखिल विश्वच एक पाऊल पुढे टाकूं शकेल.
आतां मात्र माझी लेखणी मूक झाली आहे आणि नीरवतेमध्यें मी तुझें पूजन करीत आहे. *
५ ऑक्टोबर १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे दिव्य स्वामी, तुझ्या ध्यानाच्या निश्चल - नीरवतेमध्यें प्रकृति पुनः शांत, स्थिर आणि सबल होत आहे. व्यक्तित्वाच्या सर्व मर्यादा ओलांडून ती तुझ्या अशा अनंततेमध्यें बुडून गेली आहे कीं, जेथें कांहींहि गोंधळ वा अस्ताव्यस्तता न माजतां सर्व स्तरावर एकत्वाची अनुभूति येऊं शकते. जें कांहीं टिकून राहिलेलें आहे, जें कांहीं प्रगत होत जात आहे, आणि जें कांहीं शाश्वत काळापासून आहे, त्या सर्वांमध्यें हळू हळू अधिकाधिक समृद्ध, अधिकाधिक व्यापक आणि अधिकाधिक उदात्त साम्यावस्थेनें युक्त असा सुसंवाद साध्य होत आहे. जीवनाच्या या तीन अवस्थांमध्ये जी परस्पर देवाणघेवाण होत आहे, त्यामुळें तुझी अभिव्यक्ति परिपूर्ण होत जात आहे.
पुष्कळसे लोक या समयीं दुःखीकष्टी होऊन आणि अनिश्चिततेच्या भयामुळे तुझा शोध घेत आहेत. ते आणि तूं यांच्यामधील मध्यस्थ मला होतां येऊं दे म्हणजे तुझा प्रकाश त्यांना प्रकाशित करील व तुझी शांति त्यांना शांतवील.
माझें अस्तित्व आतां केवळ तुझ्या कार्याचा एक आलंब आणि तुझ्या चेतनाशक्तीचें एक केंद्र होऊन राहिलें आहे.
सर्व मर्यादा आणि अडचणी आतां कुठच्या कुठें पार पळाल्या आहेत ! तुझ्या राज्याचा तूंच सार्वभौम स्वामी आहेस.
७ ऑक्टोबर १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
अखिल पृथ्वीवर परम प्रकाशाचा वर्षाव होऊं दे आणि प्रत्येक हृदयामध्यें परम शांति निवास करूं दे... बहुधा सर्वच लोकांना केवळ जड- भौतिक, स्थूल, निष्क्रिय, परिवर्तनविमुख तामसिक जीवनच माहीत असतें; आणि त्यांच्या प्राणशक्ती अस्तित्वाच्या या भौतिक रूपाशीं, जीवनाशीं इतक्या बांधल्या गेलेल्या असतात कीं, त्यांना मुक्त सोडल्या आणि त्या शरीराच्या बाहेर असल्या तरी केवळ याच जडभौतिक व्यापारांमध्यें त्या पूर्णपणें व्यग्र रहातात; आणि हें व्यापार अजूनहि त्रासदायक आणि दुःखदायी आहेत... ज्यांच्यामध्यें मानसिक जीवन जागृत झालेलें आहे ते अशांत, उद्विग्न, प्रक्षुब्ध, स्वेच्छाचारी आणि अरेरावी आहेत. परिवर्तन आणि पुनरुज्जीवन यांविषयीं त्यांचीं जीं स्वप्ने असतात, त्या स्वप्नांच्या भोंवऱ्यांमध्यें पूर्णपणें सांपडून जाऊन, ते सर्वकांहीं उध्वस्त करायलाहि तयार होतात; कोणत्या पायावर नवी बांधणी करावी याचेंहि त्यांना ज्ञान नसतें आणि त्यामुळें डोळे दिपविणाऱ्या त्यांच्या झगमगाटामुळे गोंधळ कमी होण्याच्या ऐवजीं ते अधिकच गोंधळ वाढवितात.
तुझ्या सर्वोच्च ध्यानाच्या अविकारी शांतीचा आणि तुझ्या अक्षय्य शाश्वततेच्या सुस्थिर अंतर्दृष्टीचा या सर्वांमध्यें अभाव आहे.
या व्यक्तित्वाला तूं तुझी अपार करुणा प्रदान केली आहेस; अपरिमित कृतज्ञतेनें मी तुला प्रार्थीत आहे कीं, हे भगवान्, वर्तमान प्रक्षोभाच्या आवरणाखालीं, या आत्यंतिक अस्ताव्यस्ततेच्या अंतरंगांत तुझा चमत्कार घडून येऊं दे. तुझी सर्वोच्च प्रसन्नता आणि विशुद्ध, अविकारी प्रकाश यांचा नियम सर्वांना ज्ञात होऊं दे. तुझ्या चेतनेप्रत शेवटीं एकदां जागृत झालेल्या मानवजातीच्या द्वारां तो परम प्रकाश पृथ्वीवर शासन करूं दे.
हे मधुर स्वामी, तूं माझी प्रार्थना ऐकली आहेस आणि तूं माझ्या हांकेला उत्तरहि देशील.
१४ ऑक्टोबर १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे भगवती माते, तूं आमच्या बरोबर आहेस; प्रत्येक दिवशी तूं मला त्याविषयीं प्रचीति देतेस. अधिकाधिक संपूर्ण आणि अधिकाधिक अखंड होत जाणाऱ्या एकात्मतेमध्यें तुझ्याशीं संयुक्त होऊन, नूतन दिव्य प्रकाशाविषयीं महान् अभीप्सा बाळगून 'आम्ही' विश्वाधिपतीकडे आणि त्याच्याहि पलीकडील परात्पराकडे वळत आहोंत. संपूर्ण पृथ्वी ही एखाद्या रुग्ण बालकाप्रमाणें आमच्या बाहूंमध्यें आहे, तिला निरोगी केलेंच पाहिजे. या तिच्या दुर्बलतेमुळेंच तिच्यावर आमचा विशेष जीव आहे. शाश्वत, अनंत काळ होत राहिलेल्या निर्मितीच्या विशालतेवर आंदोलित होऊन - वास्तविक त्या निर्मितीहि आम्हीच आहोंत - आम्ही अक्षर निश्चल - नीरवतेच्या सनातन तत्त्वाचें, शांततेनें आणि आनंदानें ध्यान करीत आहोंत; जेथे सर्व कांहीं परिपूर्ण चेतनेमध्यें आणि अविकारी 'सत् ' मध्यें नित्य साकार होत राहिलें आहे, तें अविकारी 'सत्' म्हणजे सर्वांच्या अगदीं पलीकडे असलेल्या अखिल - अज्ञेयाचें अद्भुत द्वार आहे.
आतां, पडदा विदीर्ण झाला आहे. अवर्णनीय वैभव अनाना झालें आहे आणि सर्वकांहीं अनिर्वचनीय उज्ज्वल प्रभेनें अ
असून, आम्ही जगताला सुवार्ता देण्यासाठीं त्याच्याकडे त वळत आहोंत.
हे प्रभो, तूं मला असीम आनंद प्रदान केला आहेस... आणि कोणती परिस्थिति हा आनंद माझ्यापासून हिरावून घेण्यास समर्थ आहे ?
२५ ऑक्टोबर १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे परमेश्वरा, तुझ्या संबंधींच्या माझ्या अभीप्सेनें संपूर्ण उमल- लेल्या सुगंधसंपन्न व सुंदर, डौलदार गुलाबपुष्पाचें रूप घेतलें आहे. संपूर्ण शरणागत भावनेनें मी दोन्हीं हातांनीं तें तुझ्या समोर धरून, तुझ्यापाशीं हें मागत आहे : माझी समजशक्ति मर्यादित असेल, तर ती विशाल कर; माझें ज्ञान संदिग्ध असेल, तर तें उज्ज्वलित कर; माझें हृदय उत्कटतारहित असेल, तर तें प्रज्वलित कर; माझें प्रेम सामान्य असेल, तर तें तीव्र होऊं दे; माझ्या भावना अज्ञानी आणि अहंकारी असतील तर त्यांना सत्याच्या ठिकाणीं संपूर्ण जागृत कर. आणि हे प्रभो, तुझी प्रार्थना करणारा 'मी' म्हणजे हजारों व्यक्तींमध्यें मिसळून गेलेली एक व्यक्ति नव्हे, तर अखिल पृथ्वीच औत्सुक्यपूर्णतेनें तुझ्यासाठीं अभीप्सा करीत आहे.
माझ्या ध्यानाच्या परिपूर्ण नीरवतेमध्यें सारें कांहीं अनंततेपर्यंत विशाल झाले आहे. आणि या नीरवतेच्या संपूर्ण शांतीमध्यें तुझ्या प्रकाशाच्या उज्ज्वल वैभवानें तूं विराजत आहेस.
८ नोव्हेंबर १९१४
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
तुझ्या प्रकाशसमृद्धीसाठीं आम्ही तुला आवाहन करीत आहोंत. हे भगवान्, तुला व्यक्त करण्याची शक्ति आम्हांमध्यें जागृत कर.
एखाद्या निर्जन गुहेप्रमाणें माझ्या अस्तित्वामध्ये सर्व कांहीं स्तब्ध आहे; पण छायेच्या आणि नीरवतेच्या गाभाऱ्यांत, कधींहि न विझणारा दीप तेवत आहे. तुलाच जाणून घेण्यासाठीं आणि संपूर्णतया तुलाच जीवनांत व्यक्त करण्यासाठीं तीव्र अभीप्सेचा अग्नि तेथें धगधगत आहे.
दिवसांच्या पाठीमागून रात्री येतात, गत उषांच्या पाठोपाठ नवीन उषा न थकतां, निरंतर येत रहातात; पण सदासर्वदा सुगंधित अग्निशिखा वरवरच उठत रहाते, कोणताहि वादळी वारा तिला चळवूं शकत नाहीं. उंच उंच ती चढतच रहाते, आणि एक दिवस ती, अजूनपर्यंत बंद असलेल्या घुमटापाशी येऊन पोहोंचते. आपल्या एकत्वाच्या आड येणाऱ्या शेवटच्या अडथळ्या- समोर येऊन ठेपते; आणि ही ज्वाला इतकी शुद्ध, इतकी साधी सरळ, ताठ होते कीं, हा अडथळा एकाएकी वितळून जातो.
तेव्हां, तुझ्या सर्व वैभवानिशीं, तुझें ज्योतिर्मय, विलसित रूप घेऊन, तुझ्या अनंत शक्तिसामर्थ्यासह तूं आविर्भूत होतोस; तुझ्या संस्पर्शानें या ज्वालेचें एका प्रकाश स्तंभामध्यें परिवर्तन होऊन तो सर्व छायांना कायमचें पळवून लावतो.
महान् 'शब्द' झेंप घेतो, परमोच्च आविष्कार घडवितो !
वर्ष: १९१५
१५ फेब्रुवारी १९१५
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे परम सत्यदेवा, आर्त उत्कंठतेनें तुझें आवाहन करून, तुझा आविष्कार व्हावा म्हणून मीं तीन वेळां तुला आळविलें.
नंतर, नेहमींप्रमाणें माझ्या संपूर्ण अस्तित्वानें तुला आपलें आत्मसमर्पण केलें. त्याच क्षणीं चेतनेनें मानसिक, भावात्मक आणि शारीरिक अशा वैयक्तिक अस्तित्वाला पाहिलें; या अस्तित्वावर धूलिपटलें चढलीं होतीं, या अस्तित्वानें तुझ्यासमोर साष्टांग नमस्कार घातला, पृथ्वीवर डोकें टेंकविलें, धुळीला धूळ भेटली, आणि या अस्तित्वानें तुला आर्त स्वरानें म्हटलें : “हे भगवान्, हें मृण्मय अस्तित्व तुझ्यासमोर साष्टांग प्रणिपात करीत आहे आणि प्रार्थना करीत आहे कीं, सत्याच्या अग्नीनें तें उज्ज्वलित व्हावें आणि त्यानें केवळ तुझाच आविष्कार करावा". नंतर तूं त्याला म्हटलेंस, “ऊठ, सर्व धुळीपासून आतां तूं मुक्त आहेस" आणि क्षणार्धांत, एखादें वस्त्र पृथ्वीवर गळून पडावें त्याप्रमाणें सारें धूलिपटल खाली गळून पडलें व सर्व अस्तित्व सरळ ताठ उभे राहिलें, भरीव घन स्वरूपांत, पण त्याचबरोबर तळपणाऱ्या प्रकाशानें दैदीप्यमान्.
३ मार्च १९१५
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
कामो मारू जहाजावर :
* हा कठोर आणि तीव्र एकाकीपणा... आणि ही सतत जोरदार भावना कीं, जणुं कांहीं खालीं डोकें वर पाय करून अंधःकाराच्या नरकामध्यें मला फेंकून दिलें आहे! जीवनाच्या दुसऱ्या कोणत्याच क्षणीं, दुसऱ्या कोणत्याच परिस्थितीमध्यें मला असा अनुभव आला नाहीं कीं, मी ज्याला सत्य म्हणून समजत आहे त्याच्या अगदीं उलट, जें माझ्या जीवनाचें प्रत्यक्ष सारतत्त्व आहे, त्याच्या इतक्या सर्वस्वी विरोधी परिस्थितींत मी रहात आहे. कांहीं वेळां, जेव्हां ही भावना आणि हा विरोध विशेष तीव्र होतो तेव्हां, माझ्या सर्वांगीण समर्पणाला आलेली खिन्नतेची छटा मी टाळूं शकत नाहीं; आणि अंतःस्थ भगवंताशीं माझें जें शांत आणि निःशब्द संभाषण चालतें, त्याला एक क्षणभर काकुळतीच्या आवाहनाचें स्वरूप येतें : “हे भगवान्, मी असें काय केलें आहे कीं, अशा तऱ्हेनें तूं मला अंधाऱ्या रात्रीत फेंकून द्यावेंस?" पण एकदम अभीप्सा अधिक उत्कट होते : “ सर्व प्रकारच्या दुर्बलतेपासून या व्यक्तित्वाचें रक्षण कर; असें वरदान दे कीं, तुझ्या कार्याचें, मग तें कार्य कोणतें का असेना, माझें अस्तित्व एक सालस आणि स्पष्टदृष्टिसंपन्न साधन होईल"
या समयीं स्पष्टदृष्टिसंपन्नतेचा अभाव आहे. भविष्यकाळ इतका आच्छादित कधींच नव्हता. व्यक्तिगत नियति पाहतां असें वाटतें कीं, एका उंच आणि अभेद्य भिंतीकडे आम्ही वाटचाल करीत आहोंत. पृथ्वी आणि पृथ्वीवरील राष्ट्रे यांच्या भवितव्यतेचा विचार करतां, ती अगदीं सुस्पष्ट आहे; पण त्याविषयीं आज बोलणें व्यर्थ आहे; भविष्यकाळ ती नियति सर्वांच्या दृष्टिसमोर, आंधळ्यां- च्याहि समोर स्पष्टपणें प्रकट करील.
७ मार्च १९१५
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
मनाच्या मधुर, निश्चल नीरवतेचा काळ संपला आहे; तो काळ किती शांतिपूर्ण आणि निर्मळ होता! आपल्या सर्वसमर्थ सत्यासह व्यक्त होणारी ती गभीर इच्छाशक्ति त्यांत अनुभवास येत होती. आतां ती इच्छाशक्ति प्रतीत होत नाहीं आणि परिणामतः साहजिकच मन सक्रिय होऊन विश्लेषण, पृथक्करण, निर्णय, निवड करीत आहे; त्याचप्रमाणें व्यक्तित्वावर जें जें कांहीं लादलें गेलें आहे त्या सर्वांवर रूपांतरकारी शक्तींच्या स्वरूपांत सतत तें प्रतिक्रिया करीत आहे. हें व्यक्तित्व इतकें विशाल झालें आहे कीं, तें असीमतः विशाल, संकीर्ण आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टींप्रमाणें अंध:कार आणि प्रकाशाचें मिश्रण असलेल्या अशा एका दुसऱ्या जगताच्या संपर्कांत आलेलें आहे. * या अवस्थेत सर्व प्रकारच्या आध्यात्मिक सुखाला मी मुकलें आहे, मला निर्वासित केलें गेलें आहे आणि तूं घेत असलेल्या अग्निपरीक्षेमध्यें निश्चितच हें सर्वांत अधिक दुःखदायक अग्निदिव्य आहे; विशेषतः तुझी इच्छाशक्ति तूं काढून घेणें ही तर तुझ्या पूर्ण अप्रसन्नतेची खूण असावी असें वाटतें. तूं माझा परित्याग केल्याची भावना अधिकाधिक वाढत आहे, त्यामुळे अशा रीतीनें परित्यक्त, एकाकी बाह्य जाणिवेला दुःखाच्या अनिवार्य अशा आक्रमणापासून वांचविण्यास अश्रांत श्रद्धेची तीव्रता अत्यंत आवश्यक आहे....
* पण ही जाणीव हताश होण्याचें नाकारत आहे; हें दुर्भाग्य निवारण करतां येण्याजोगें नाहीं, यावर तिचा विश्वास बसूं शकत नाहीं. नम्रपणानें ती वाट पहात राहिली आहे; तुझ्या संपूर्ण आनंदाचा निःश्वास तिच्यामध्यें पुनः प्रविष्ट व्हावा म्हणून मुकाट्यानें गुप्तपणानें, ती प्रयत्न आणि संघर्ष करीत राहिली आहे. आणि कदाचित्, तिनें मिळविलेला प्रत्येक साधासुधा आणि गुप्त विजय म्हणजे पृथ्वीला केलेले खरें सहाय्यच असेल..
* खरोखरी या बाह्य जाणिवेंतून कायमचें बाहेर येणें, दिव्य चेतनेचा आश्रय घेतां येणें शक्य असतें तर !... पण तें तर तूं अमान्य ठरविलें आहेस आणि अजूनहि, नेहमींच त्याला तुझा विरोध आहे; जगांतून बाहेर पळून जायचें नाहीं. जरी सर्व प्रकारचे दैवी सहाय्य देणें स्थगित केलें आहे असें भासलें, तरी जगांतील अंधःकाराचा आणि बीभत्सतेचा बोजा शेवटपर्यंत वाहिलाच पाहिजे. आंतरिक दीपस्तंभ अथवा मार्गदर्शक कांहीहि नसले तरी मला गाढ रात्रीच्या निबिड अंधःकारांत चालत राहिलें पाहिजें, पुढें पुढेंच गेलें पाहिजे...
* मी तुझ्याकडून आतां करुणेचीहि अपेक्षा करणार नाहीं. कारण माझ्यासाठीं तूं जें कांहीं इच्छित असशील तेंच मीहि इच्छित आहे. केवळ पुढे जाण्यासाठीं, सतत पुढे जाण्यासाठीं, अंधःकाराची घनता कितीहि असली किंवा मार्गावर कितीहि अडथळे असले, तरी त्यांतूनच एकेक पाऊल पुढें पुढें सरकण्यासाठीं माझी सारी शक्ति धडपडत आहे. हे भगवान्, कांहींहि घडलें तरी तीव्र आणि चिरस्थायी प्रेमानें मी तुझ्या निर्णयाचें स्वागत करीन तुझी सेवा करण्यासाठीं हें साधन अपात्र आहे असें जरी तुला आढळून आलें असले, तरी तें आतां त्याचें स्वतःचें राहिलेलें नाहीं, तें केवळ तुझेंच आहे... तूं तें नष्ट करूं शकतोस किंवा त्यास महानताहि प्रदान करूं शकतोस. त्याचें स्वतःचें असें त्याला अस्तित्व राहिलेलें नाहीं; आणि तुझ्याशिवाय त्याला दुसरी कशाचीहि इच्छा राहिलेली नाहीं; तुझ्याशिवाय तें कांहीं करूं शकत नाहीं. *
८ मार्च १९१५
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
आतां बहुतेक वेळ, शांत आणि सखोल उदासीनतेची अवस्था आहे; माझ्या अस्तित्वामध्यें कोणत्याच प्रकारचा भाव नाहीं; ना वासना ना वैराग्य, ना उत्साह ना निराशा, ना सुख ना दुःख. अस्तित्व जीवनाला नाटक समजत असून, त्यांत त्याचा एक अत्यल्प भाग आहे. सर्व क्रिया आणि प्रतिक्रिया, निरनिराळ्या शक्तींचा संघर्ष यांकडे तें अस्तित्व एका बाजूनें अशा रीतीनें पहात आहे कीं, जणुं कांहीं या सर्व गोष्टी एका दृष्टीनें त्याचाच एक भाग आहेत आणि त्याचवेळीं दुसऱ्या दृष्टीनें या सर्व गोष्टी त्याच्या अस्तित्वाला अगदीं परक्या आणि दूरस्थ आहेत. या अस्तित्वाने संकुचित व्यक्तिमत्वाच्या मर्यादा सर्व बाजूंनी तोडून टाकल्या आहेत.
पण मधून मधून एक मोठा हेलकावा येऊन जातो; दुःख, वेदनापूर्ण एकाकीपण, त्याचप्रमाणें आध्यात्मिक अनाथपणाची भावना यांचा हेलकावा - किंवा असें म्हणतां येईल कीं, भगवंतानें परित्यक्त केलेल्या अशा पृथ्वीची आर्त, केविलवाणी हांक. ही वेदना जशी मूक तशीच ती निष्ठुर आहे. तें एक शरणभावयुक्त दुःख आहे; त्यांत विद्रोह नाहीं किंवा या स्थितींतून बाहेर पडण्याची किंवा ती टाळण्याची इच्छाहि त्यांत नाहीं. ज्यामध्यें दुःखकष्ट आणि अत्यानंद ही घनिष्ठ रीतीनें संलग्न झालेली आहेत असें असीम माधुर्य त्यांत भरलेले आहे. अमर्यादपणें विशाल, महान् आणि गहन अशी कांहींतरी ती वस्तु आहे; इतकी महान्, इतकी गहन कीं कदाचित् मानवाला ती समजूं शकणार नाहीं - ती अशी वस्तु आहे की, स्वतःमध्ये देवी भविष्याचें बीज ती धारण करीत आहे...
वर्ष: १९१६
२६ डिसेंबर १९१६
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे प्रभो, नीरवतेमध्यें तूं मला जी वाणी ऐकवितोस ती नेहमींच उत्साहवर्धक आणि मधुर असते. पण हें माझ्या लक्षांत येत नाहीं कीं, तूं एवढी जी कृपा करतोस तिला योग्य असें या साधनामध्यें आहे तरी काय किंवा तूं त्याच्याकडून जें कांहीं अपेक्षितोस तें कार्य साध्य करण्यास आवश्यक तें सामर्थ्य त्याच्यामध्यें कसें असणार ? इतकी मोठी जबाबदारीची भूमिका घेण्यासाठीं जी शक्ति असावयास पाहिजे, त्या मानानें या साधनामधील सर्वकांहीं इतकें क्षुद्र, दुर्बळ, सामान्य प्रतीचे दिसत आहे; त्यास ना तीव्रता, शक्ति, ना विपुलता. पण मला हें माहीत आहे कीं, मनाला जें काय वाटतें त्याला तितकें कांहीं महत्त्व नाहीं. स्वतः मनालाहि हें कळतें आणि म्हणून स्वतः तें निष्क्रिय राहून, तुझा आदेश कार्यरूप होण्याची प्रतीक्षा करीत राहिलें आहे.
निरंतर झगडत राहण्यास तूं मला सांगत आहेस. प्रत्येक अडचणीवर मात करण्यास लागणारा दुर्दम्य उत्साह मला मिळावा अशी मी इच्छा करीत आहे. तूं माझ्या हृदयांत अशी कांहीं सस्मित शांति भरून टाकली आहेस कीं, त्यामुळें झगडत कसें रहावयाचें हें तरी आतां मला समजेल कीं नाहीं असें मला वाटूं लागलें आहे... माझ्यामध्यें निरनिराळया क्षमता आणि कार्यप्रवृत्ती विकसित होत आहेत, जशी फुलें विनासायास अगदीं सहज उमलतात तशा; अस्तित्वांतील आनंद, विकसनांतील आनंद, तुला अभिव्यक्त करण्यांतील आनंद घेत घेत; मग ती अभिव्यक्ति कोणत्या का प्रकारची असेना! समजा संघर्ष जरी असला, तरी तो इतका सौम्य आणि सोपा आहे कीं, त्यास तसें नांवहि देतां येणार नाहीं महान् प्रेम धारण करण्याच्या दृष्टीनें हें हृदय किती लहान हे ! आणि तें प्रेम वितरण करतां येण्याच्या दृष्टीनें ही प्राणशक्ति आणि हें शरीर किती दुर्बल! अद्भुत मार्गाच्या उंबरठ्यावर तूं मला आणून उभें केलें आहेस. पण त्यावर अग्रेसर होण्याची शक्ति माझ्या पायांत असेल कां ?... तूं मला उत्तर देत आहेस कीं, माझें काम भरारी मारण्याचें आहे आणि चालण्याची इच्छा करणें हें चुकीचें होईल... हे परमेश्वरा, तुझी कृपा किती अपरंपार आहे ! पुनः एकदां तूं मला आपल्या सर्वशक्तिमान् बाहूंमध्ये घेतलेस आणि तुझ्या अगाध हृदयाच्या पाळण्यामध्यें झुलविलेंस; आणि तुझें हृदय मला म्हणाले, “थोडीशीहि चिंता तूं करूं नकोस. बालकाप्रमाणें भार टाकून निश्चिंत रहा. तूं म्हणजे माझ्या कार्यासाठीं घनरूप झालेला 'मी' स्वतःच नाहीं कां ?"
२७ डिसेंबर १९१६
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे परमप्रिय परमेश्वरा, माझें हृदय तुझ्यापुढें नत झालें आहे, माझे बाहू तुझ्यासमोर पसरले आहेत. ते तुला प्रार्थना करीत आहेत कीं, तुझ्या उदात्त प्रेमाग्नीनें माझें सबंध अस्तित्व प्रज्वलित कर, म्हणजे तें प्रेम तेथून सर्व जगभर फैलावेल. माझ्या वक्षःस्थलामध्यें माझें हृदय पूर्ण उघडें आहे; तें खुलें आहे आणि तुझ्याकडे वळलेलें आहे; तूं तुझ्या दिव्य प्रेमानें भरून टाकवेंस म्हणून तें उघडें आहे आणि रितें आहे. तुझ्याशिवाय बाकी सर्वकांहीं त्यांतून निघून गेल्यानें तें रिकामें आहे आणि तुझी उपस्थिति त्याच्या कोनाकोपऱ्यांत
भरून राहिली आहे; तरीहि तिनें तें रिकामेंहि ठेवलें आहे, कारण अभिव्यक्त झालेल्या जगाची अनंत विविधताहि त्यामुळें तें धारण करूं शकत आहे.
हे परमेश्वरा, माझें बाहू विनीत भावानें तुझ्या सन्मुख पसरले आहेत. तूं माझ्या हृदयाला तुझ्या अनंत प्रेमाचे भांडागार करावेंस म्हणून तें तुझ्यासमोर सताड उघडें आहे...
"सर्व वस्तूंमध्यें, सर्वत्र आणि सर्व जीवांमध्यें तूं माझ्यावर प्रेम कर", हेंच उत्तर तूं मला दिलेंस. मी तुझ्यासमोर साष्टांग प्रणिपात करून, तुझ्याकडून हेंच वरदान मागत आहे कीं, यासाठीं लागणारी शक्ति तूं मला प्रदान कर.
वर्ष: १९१७
३० मार्च १९१७
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
* स्वतःच्याविषयीं मुळींच विचार न करण्यामध्यें, सर्वो असा, राजाला साजेसा एक प्रकारचा रुबाब आहे. गरजा हें, आपण दुर्बळ आहों याचें चिह्न आहे. कोणत्याहि मागणी करणें म्हणजे आपल्यापाशीं त्या वस्तूचा अभाव हें सिद्ध करणें आहे. कोणतीहि वासना असणें याचा अर्थच आहे असमर्थता; आपल्या मर्यादा ओळखून त्या ओलांडण्याची आपणांत क्षमता नाहीं याची कबुली देण्यासारखें तें आहे.
योग्य अशा स्वाभिमानाच्या दृष्टीनें केवळ पाहतांहि मनुष्यानें आपली सर्व वासना सोडावी यांत त्याची कुलीनता आहे. जीवनशक्तीकडून किंवा तिलाहि संजीवित करणाऱ्या परमोच्च चेतनेकडून स्वतःसाठीं कांहीं मागणें किती अपमानास्पद आहे ! आपल्या बाजूनें ती क्षुद्रपणाची गोष्ट आहे, तिच्या दृष्टीनें तें अपमानकारक अज्ञान आहे. कारण, वास्तविक सर्वकांहीं आपल्या आवांक्यांत आहे. पण आपल्या अस्तित्वाच्या अहंकाराच्या मर्यादा आपल्या आड येतात व त्यामुळें आपण संपूर्ण विश्वाचा उपभोग घेऊं शकत नाहीं. नाहीं तर, ज्याप्रमाणें आपण आपल्या शरीराचा आणि भोंवतालच्या वस्तुस्थितीचा संपूर्णपणें आणि अगदीं प्रत्यक्षपणें उपभोग घेऊं शकतो, तसा संपूर्ण विश्वाचाहि घेतां आला असता.
* कर्माच्या साधनांच्या बाबतींतहि आमची भूमिका अशीच असली पाहिजे.
हे प्रभो, तू माझ्या हृदयांत निवास करतोस आणि
तुझ्या सर्वोच्च संकल्पशक्तीच्या द्वारां सर्व बाबतींत मार्गदर्शन करतोस. एक वर्षापूर्वी तू म्हटलें होतेंस कीं, सर्व सेतु तोडून टाक आणि अज्ञातामध्यें स्वतःला संपूर्णपणें झोंकून दे; 'रुबिकन' नदी ओलांडण्याच्या वेळीं ज्याप्रमाणें सीझरनें केलें होतें : त्यावेळीं त्याची अशी प्रतिज्ञा होती कीं, एक तर 'कॅपिटॉल' पर्वताच्या शिखरावर चढूं, नाहींतर 'टार्पियन' खडकाच्या तळाशीं फेंकलें जाऊं.
माझ्या कर्माचें फळ तूं त्यावेळीं माझ्या दृष्टीआड ठेवलेंस, अजूनहि तूं तें गुप्त ठेवीत आहेस; तरीहि तुला माहीत आहे कीं, ऐश्वर्यासमोर किंवा दैन्यासमोर मी माझ्या आंतरात्म्याची समता कायम ठेवूं शकते.
तूंच अशी इच्छा केलीस कीं, माझा भविष्यकाळ हा मला अनिश्चित असावा आणि मार्ग कुठे नेत आहे हें कळत नसतांहि, दृढ विश्वासानें मी मार्गक्रमण करीत रहावें.
तूंच अशी इच्छा केलीस कीं, माझ्या नियतीचा सर्व भार संपूर्णपणें मीं तुझ्यावर सोंपवावा आणि माझ्या सर्व वैयक्तिक व्यवधानांचा सर्वस्वीं त्याग करावा.
माझ्या स्वतःच्या मनालाहि माझा मार्ग अगदीं नवखा आणि अस्पर्शित असावा हाच हेतु निश्चित त्याच्या मागें असला पाहिजे.
३१ मार्च १९१७
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
तुझ्या दिव्य निःश्वासाच्या स्पर्शामुळे जेव्हां जेव्हां एखादें हृदय हेलावतें, त्या त्या वेळीं पृथ्वीवर कांहीं अधिक सौंदर्य निर्माण झालेलें दिसतें, मधुर सुगंधानें वातावरण दरवळून जातें आणि सर्वांच्या ठायीं सुहृद्भाव निर्माण होतो.
हे जीवननाथ, तुझें सामर्थ्य किती महान् आहे ! कितीतरी गडद अंधःकार आणि कितीतरी दुःखें तुझ्या आनंदाच्या एका कणानेंहि नाहींशी होऊन जातात आणि तुझ्या वैभवाच्या केवळ किरणानेंहि अगदीं निर्जीव दगडधोंडेहि प्रकाशित होतात, : अंधारमय जाणीवहि उजळून जाते !
झ्यावर अनुग्रहांचा वर्षाव केला आहेस आणि मला अनेक उकलून दाखविली आहेस. कितीतरी अनपेक्षित आणि ल्पत आनंदाचा स्वाद तूं मला दिला आहेस; परंतु तुझ्या दिव्य निःश्वासाच्या स्पर्शप्राप्तीने जेव्हां हृदय हेलावतें, तेव्हां त्या कृपेची बरोबरी दुसरें कोणतेंच वरदान करूं शकणार नाहीं.
या मंगलसमयीं अखिल पृथ्वी आनंदाचें गान गात आहे, गवताचीं पातीं सुखानें थरथरत आहेत, वातावरण प्रकाशानें स्पंदित झालें आहे, वृक्ष आपली अति आर्त प्रार्थना स्वर्गाप्रत उच्च नेत आहेत, पक्षांच्या किलबिलाटामधून एक संगीत निनादत आहे. सागराच्या लाटा प्रेमानें उसळत आहेत, बालकांचें हास्य अनंत परमेश्वराचें स्मरण करून देत आहे, आणि मानवांचें आत्मे त्यांच्या डोळयांमधून दर्शन देत आहेत.
उत्सुक हृदयामध्यें अशी उषा निर्माण करता येईल, त्यांच्यामध्यें तुझ्या परम श्रेष्ठ अस्तित्वाची जाणीव उदित करतां येईल आणि या रुक्ष आणि दुःखित जगामध्यें तुझें खरें नंदनवन थोडें तरी निर्माण करतां येईल अशी अद्भुतरम्य शक्ति तूं मला प्रदान करशील का ? सांग मला. दुसरें कोणतें सौख्य, कोणती संपत्ति, कोणत्या ऐहिक शक्ती या अद्भुत देणगीची बरोबरी करूं शकतील?
हे प्रभो, माझी प्रार्थना कधीं निष्फल झालेली नाहीं, कारण वास्तविक तूंच माझ्या तोंडून ही प्रार्थना वदवीत आहेस....
तुझ्या सर्वसमर्थ, उद्धारक प्रेमाच्या जागत्या ज्योतीचा, समृद्धि निर्माण करणारा वर्षाव थेंबाथेंबानें तूं पडूं देत आहेस. तमोमय आणि अज्ञानपूर्ण अशा आमच्या या जगांत जेव्हां हें शाश्वत प्रकाशाचें बिंदू अलगदपणें पडूं लागतात, तेव्हां असें वाटतें कीं, मेघाच्छादित गगनांतून जणुं सोनेरी तारकांचा पृथ्वीवर पाऊस पडत आहे.
नित्य नवरूपधारी अशा या महान् आश्चर्यासमोर सर्वकांहीं मुग्ध भक्तिभावानें वंदन करीत आहे.
७ एप्रिल १९१७
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
एका गभीर एकाग्रतेनें मला भारलें आणि मला असा अनुभव आला कीं, चेरीच्या एका फुलाशीं, मोहराशीं मीं एकात्म पावत आहे आणि त्याच्या द्वारां सर्वच फुलांशी एकजीव होत आहे. त्यानंतर एका निळसर शक्तिप्रवाहाचें अनुसरण करीत, जेव्हां मी माझ्या चेतनेमध्यें अधिक खोल उतरलें, तेव्हां अचानकपणें सबंध चेरीवृक्षच मी बनले. या वृक्षानें आपल्या असंख्य शाखा अगणित बाहूंप्रमाणें आकाशाप्रत वर उंच उभारल्या होत्या आणि त्या शाखा आपल्या पूजापुष्पांनी फुलून गेल्या होत्या. त्यानंतर मी स्पष्टपणें हें वाक्य ऐकलें, “याप्रमाणें चेरीवृक्षाच्या आंतरात्म्याशीं तुझें तादात्म्य झालें आहे आणि त्यामुळे तूं हैं समजूं शकत आहेस कीं, स्वतः भगवंतच ही पुष्परूपी प्रार्थना स्वर्गाप्रत समर्पित करीत आहे."
हें सर्व मी लिहून काढलें आणि त्वरित् सर्वकांहीं पुसून गेलें; तरीपण अजूनहि चेरीवृक्षाचें रक्त माझ्या रक्तवाहिन्यांमधून वहात आहे आणि त्याच्या बरोबरच अतुलनीय शांतीचा आणि शक्तीचा प्रवाह वहात आहे. मानवी शरीर आणि वृक्षाचें शरीर यांमध्यें काय फरक आहे ? खरें पाहिलें तर, तसा कांहींच फरक नाहीं आणि दोघांनाहि संजीवन देणारी चेतना पाहिली, तर ती एक, अभिन्न आहे.
तर चेरी वृक्ष माझ्या कानांत हळूच कुजबुजला : पाल अस्वास्थ्यांवरील उपाय चेरीच्या फुलांमध्यें आहे."
२८ एप्रिल १९१७
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे प्रिय दिव्य स्वामिन्,
आज रात्रीं तूं माझ्या समोर तुझ्या संपूर्ण दैदीप्यमान् ऐश्वर्यासह प्रकट झालास. क्षणार्धांत तूं माझ्या अस्तित्वाला पूर्णपणें विशुद्ध, प्रकाशपूर्ण, निष्कलंक आणि सचेतन बनवूं शकतोस. त्याच्यावर राहिलेल्या शेवटच्या काळ्या डागांपासूनहि तूं त्याला मुक्त करूं शकतोस, त्याच्या शेवटच्या आवडीनिवडीपासूनहि त्याची कायमची सुटका करूं शकतोस; तूं हें सर्वकांहीं करूं शकतोस... आणि आजच्याच या रात्रीं तूं हें सर्व करूनहि टाकलें नाहींस कां ? तुझ्या दिव्य स्रोतानें आणि अवर्णनीय प्रकाशानें तूं माझें अस्तित्व ओतप्रोत, आरपार भरून टाकलें होतेंस ना ? शक्य आहे... कारण माझ्यामध्यें निश्चलता आणि असीम विशालता यांनी परिपूर्ण अशी एक अतिमानवी शक्ति विद्यमान आहे. हे प्रभो, असें वरदान दे कीं, या शिखरावरून मी मुळींच खाली येणार नाहीं. अशी कृपा कर कीं, माझ्या अस्तित्वामध्यें सदासर्वदा शांतीचें अधिराज्य राहील; अस्तित्वाच्या केवळ खोल खोल भागांतच नव्हें. कारण,
तेथें तर फार दीर्घकालापासून ती सम्राज्ञी आहे. पण माझ्या लहानांत लहान बाह्य क्रियांमध्येंहि, माझ्या हृदयाच्या कोनाकोपऱ्यांतहि आणि बारीकसारीक कृतींतहि हें अधिराज्य असेल.
हे सर्वजीवोद्धारक भगवंता, मी तुला वंदन करीत आहे.
"हीं पहा ! येथें आहेत फुलें आणि आशीर्वाद; येथें आहे, दिव्य प्रेमाचें स्मित! त्या प्रेमामध्यें ना पसंती - नापसंती, ना कांहीं राग- द्वेष... तें सर्वांच्याकडे उदारतेनें वहात जातें आणि आपल्या अद्भुत देणग्या कधींहि परत मागून घेत नाहीं."
ही सनातन माता दिव्यानंदावस्थेत आपलें बाहू उभारून, तिच्या शुद्धतम प्रेमाच्या दंवबिंदूंचा वर्षाव निरंतरपणें करीत आहे.
२४ सप्टेंबर १९१७
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
टोकियो :
तूं माझ्याकडून खडतर साधना करवून घेतली आहेस. तुझ्याप्रत नेणाऱ्या सोपानानें मी पायरी पायरीने वर चढलें आणि सर्वांत शेवटच्या पायरीवर तुझ्याशी तादात्म्य पावण्यांतील संपूर्ण आनंदाची माधुरी तूं मला चाखावयास दिलीस. नंतर तुझी आज्ञा शिरसावंद्य करूनच, पायरी पायरीनें मी बहिर्मुख व्यवहारांत व जाणिवेच्या बाह्यवति पातळीपर्यंत उतरलें; तुझा शोध घेण्यासाठीं ज्या जगतांचा मी त्याग केला होता, त्यांच्याशीं मी पुनश्च संबंध जोडला. आतां मी सोपानाच्या सर्वांत खालच्या पायरीपर्यंत परत येऊन पोहोचलें आहे; येथें माझ्या सभोंवती आणि आंतहि सर्वच कांहीं इतकें नीरस, सामान्य प्रतीचें आणि उदासीन आहे कीं, त्यामुळे माझी मति पंठित झाली आहे...
कोणत्याहि प्रकारची तपस्या न करतां सर्वसामान्य जी स्थिति प्राप्त करून घेतात, तीच स्थिति जर माझ्या
असेल, तर इतक्या मंद आणि प्रदीर्घ पूर्वतयारीचा काय ग? तर मग माझ्याकडून तुझी वास्तविक अपेक्षा तरी काय आहे ?
मी जें जें पाहिलें आहे तें पाहिल्यानंतर, जें जें अनुभवलें आहे तें अनुभवल्यानंतर, तुझ्या ज्ञानमंदिराच्या पवित्र गाभाऱ्यामध्यें तुझ्याशीं एकत्व पावण्याचा अनुभव तूं मला दिल्यानंतरहि इतक्या सामान्य अवस्थेमध्यें नेऊन, तूं मला सर्वतोपरि इतकें सामान्य साधन बनविणें हें कसें काय शक्य आहे ? खरेंच, हे प्रभो, तुझे हेतू अगम्य आहेत, माझ्या आकलनशक्तीच्या बाहेरचे आहेत.
तुझ्या संपूर्ण दिव्य परमानंदाचें तेजस्वी रत्न तू माझ्या अंतःकरणांत ठेवून, त्याच्या पृष्ठभागावर मात्र बाह्य छाया कां प्रतिबिंबित होऊं देतोस ? त्यामुळें तूं मला प्रदान केलेल्या शांतीचा, दिव्य संपदेचा मागमूसहि लागत नाहीं, ती जणुं निष्प्रभ ठरते. असें कां ? खरोखरीच हें सारें गूढ आहे, माझी मति याने गुंग होऊन जाते.
इतकी महान् आंतरिक नीरवता तूं मला दिल्यानंतरहि मला इतका वाचाळपणा कां करूं देतोस ? इतक्या क्षुल्लक गोष्टींमध्यें विचारमग्न कां राहूं देतोस ?... असें कां ? अनंत काळपर्यंत मी अशी विचारणा करूं शकेन, पण कदाचित् नेहमींच ती निष्फळच ठरेल...
तुझी आज्ञा शिरसावंद्य करणें आणि प्राप्त परिस्थितीचा मुकाट्यानें स्वीकार करणें एवढेंच माझें काम.
अनंतकाळपर्यंत आपलीं वेटोळी उलगडत राहणाऱ्या जगत्रूपी विराट् शेषाचें तटस्थपणें निरीक्षण करणारी मी आतां एक केवळ प्रेक्षक आहे.
( कांहीं दिवसांनंतर )
प्रभो, तुझ्या आज्ञेसमोर असमर्थ ठरून कितीदां तरी मी तुला प्रार्थना केली आहे :
"या पार्थिव चेतनेच्या गर्तेपासून मला दूर ठेव; तुझ्याशीं परम ऐक्य साधून त्यांत मला विलीन होऊन जाऊं दे."
पण मला माहीत आहे, माझी प्रार्थना भित्री, बुजरी असली पाहिजे आणि म्हणूनच ती फलद्रूप होत नाहीं.
१५ ऑक्टोबर १९१७
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे भगवान्, हताश होऊन मीं तुला आर्त हांक मारली आणि तूं माझ्या हाकेला 'ओ' दिलीस.
माझ्या जीवनाच्या परिस्थितीविषयीं तक्रार करण्याचा मला अधिकार नाहीं; मी जें कांहीं आहे त्याला अनुसरून ही परिस्थिति आहे, नाहीं कां ?
तुझ्या ऐश्वर्याच्या उंबरठ्यापर्यंत तूं मला नेलेंस आणि तुझ्या दिव्य सुसंवादाचा आस्वाद मला दिलास म्हणून मला वाटलें कीं, माझें ध्येय मीं गांठलें; पण वास्तविक तुझ्या दिव्य प्रकाशाच्या संपूर्ण प्रभेमध्यें तूं हें साधन न्याहाळलेंस आणि या जगाच्या मुशींत पुनः परत ठेवून दिलेंस, यासाठीं कीं, तें पुनः वितळावें आणि विशुद्ध व्हावें.
परमोच्च आणि आर्ततापूर्ण अशा या अभीप्साकाळांत असा अनुभव येत आहे, मी असें पहात आहे कीं, मला क्या शीघ्र गतीनें तूं मला रूपांतराच्या मार्गावरून ओढत महेस आणि अनंत सत्तेशीं जागृत संस्पर्श प्राप्त झाल्यानें झें संपूर्ण अस्तित्व थरथरत आहे.
अशा रीतीनें तूं मला या नवीन अग्निदिव्यांतून पार पडण्यास धीर आणि बल प्रदान करीत आहेस.
२५ नोव्हेंबर १९१७
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे जगदीश्वरा, दारुण दैन्यावस्थेत मनःपूर्वक श्रद्धेनें मी तुला म्हटलें : "तुझीच इच्छा पूर्ण होवो !" आणि म्हणूनच तुझ्या परम वैभवानें सुसज्ज होऊन तूं आलास. तुझ्या चरणीं मीं साष्टांग प्रणिपात केला आणि तुझ्या वक्षःस्थलावर मला आश्रय मिळाला. तूं माझें अस्तित्व तुझ्या दिव्य प्रकाशानें भरून, भारून टाकलें आहेस आणि तुझ्या दिव्यानंदानें तें ओतप्रोत केलें आहेस. तुझा संबंध पुनः तूं दृढ केला आहेस आणि तुझें सान्निध्य निरंतर राहील याविषयीं आश्वासन दिलें आहेस. कधींहि अंतर न देणारा असा विश्वासु मित्र तूं आहेस, तूंच माझी शक्ति, आश्रय आणि मार्गदर्शक आहेस. अंधःकाराला छिन्नभिन्न करणारा प्रकाश तूं आहेस. विजयश्री- ची निश्चिति देणारा विजेता तूं आहेस. तूं उपस्थित आहेस म्हणून सर्वकांहीं स्पष्ट झालें आहे. माझ्या संरक्षित बलसंपन्न हृदयामध्यें 'अग्नि' पुनश्च प्रज्वलित झाला आहे आणि त्याचें तेज सर्वत्र पसरून तें, वातावरणास तेजोमय आणि पवित्र करीत आहे...
इतके दिवस दबून राहिलेलें तुझ्याविषयींचें माझें प्रेम आतां पुनः वर उफाळून येत आहे. तें सामर्थ्यसंपन्न, सर्वशक्तिमान् आणि अदम्य झालें आहे—अग्निदिव्यांतून पार पडल्यामुळें तें दशगुणित झालें आहे. आपल्या एकांतवासामध्ये त्याला शक्ति प्राप्त झाली आहे. अस्तित्वाच्या पृष्ठभागावर येण्याची, संपूर्ण जाणिवेवर स्वामित्वभावानें अधिकार चालविण्याची, आपल्या ओसंडून वाहणाऱ्या प्रवाहामध्यें सर्वकांहीं सामावून घेण्याची शक्ति त्याला मिळाली आहे. ...
तूं मला म्हटलें आहेस : "यापुढें तुला कधींहि सोडून न जाण्यासाठींच मी परत आलो आहे.
आहे." जमिनीवर डोकें टेंकून मी तुझ्या आश्वासनाचा स्वीकार केला
वर्ष: १९१८
१२ जुलै १९१८
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
एकाएकी तुझ्यासमोर माझा अभिमान गळून पडला. तुझ्या सान्निध्यांत असतांना, स्वतःच्या अतीत जाण्याची इच्छा करणें कसें व्यर्थ आहे हें मला समजलें ... आणि मी रडले; मनसोक्त, मोकळे - पणानें मीं अश्रू ढाळले माझ्या जीवनांतील ते मधुरतम अश्रू ! * खरेंच किती मधुर होते ते. त्यांनी मला किती शांत आणि विश्रांत वाटले! न लाजतां, न आवरतां तुझ्यासमोर ओघळलेलें ते अश्रू ! पित्याच्या बाहूमध्ये असलेल्या बालकाप्रमाणें माझें तें रडणें नव्हतें कां? पण तो दिव्य पिता! किती थोर, किती उदात्त, भव्य अ किती अगाध त्याचें आकलन ! आणि सांत्वन करण्याचें ढें महान्, अपरंपार ! खरेंच, तें अश्रू पावन दंवबिंदूंप्रमाणें माझ्या स्वतःच्या दुःखामुळें मी ते ढाळले नव्हते म्हणून का ते इतके विशुद्ध होते?* खरोखरीच, ते किती मधुर आणि हितकर होते ! त्यांच्यामुळेंच मी माझें सारें हृदय तुझ्यापुढें मोकळेपणानें उघडें केलें आणि काय चमत्कार, मला तुझ्यापासून दूर ठेवणारीं, उरलेली सारी विघ्नें क्षणार्धांत पार वितळून गेली.*
कांहीं दिवसांपूर्वी मला कळले होतें, मी अशी वाणी ऐकली होती : " मनमोकळेपणानें आणि निःसंकोचपणें जर तू माझ्यासमोर रडशील, तर अनेक गोष्टी बदलून जातील, एक महान् विजय प्राप्त होईल." आणि म्हणूनच जेव्हां माझ्या हृदयामधून, माझ्या नेत्रांपर्यंत अश्रू आले, तेव्हां मी तुझ्यासमोर येऊन बसलें व भक्ति- भावानें अर्पण म्हणून ते तुझ्यासमोर ढाळले. खरेंच, हें अर्पण किती मधुर आणि संतोषदायी होतें !
* आणि आतां जरी मी अश्रू ढाळत नसले, तरी मला इतकी निकटता अनुभवास येत आहे कीं, त्यामुळें माझें सारें अस्तित्वच हर्षानें थरारत आहे.
बोबड्या शब्दांत माझा आदरभाव मला व्यक्त करूं दे :...
हर्षभरित बालकाप्रमाणें मीं तुला हांक मारून म्हटलें : "हे सर्वोत्तम एकमेव जिवलगा, आम्ही तुला काय प्रार्थना करणार आहोंत हें तुला आधींच कळते; कारण तूंच तर तिचें उगमस्थान असतोस !
"हे सर्वोत्तमा, माझ्या एकमेव सुहृदा, आम्ही जसें असूं तसें तूं आमचा स्वीकार करतोस, आमच्यावर प्रेम करतोस, आमचें अंतरंग ओळखतोस; कारण तूंच तर आम्हांला तसें बनविलेलें आहेस.
" हे सर्वोत्तम एकमेव पथप्रदर्शका, आमची जी उच्चतम इच्छा असेल, ती तूं कधींच अमान्य करीत नाहींस, कारण तूंच आमच्या द्वारां ती इच्छा करीत असतोस.
"आमची याचना ऐकण्याकरितां आम्हांला जाणून घेण्याकरितां, आमच्यावर प्रेम करण्याकरितां किंवा मार्गदर्शन करण्याकरितां आम्हीं तुझ्याखेरीज अन्य कोणाकडे धांव घेणें हें मूर्खपणाचें ठरेल; कारण तूं तें करण्यास नेहमींच तयार असतोस, तूं आम्हांला कधींच अंतर देत नाहींस.
" तुझ्यावर संपूर्ण भरंवसा टाकून, पूर्ण निश्चित राहिलें असतां आणि सहजभावानें आणि मनमोकळेपणानें तुला समग्र, निःशेष आणि निर्लेप, निर्मळ असें समर्पण केलें असतां प्राप्त होणाऱ्या सर्वोत्तम, उदात्त आनंदाची तूं मला जाणीव करून दिलीस."
आणि हे प्राणप्रिया, प्रमुदित बालकाप्रमाणें एकाच वेळीं मीं तुजसमोर स्मित केलें आणि अश्रुसिंचन केलें !*
वर्ष: १९१९
३ सप्टेंबर १९१९
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
ओइवाके :
इतक्या प्रेमानें आणि काळजीपूर्वक केलेलें अन्न त्या माणसानें नाकारलें म्हणून तें ग्रहण करण्यासाठीं मीं देवाला आवाहन केलें.
हे देवा, तूं माझें निमंत्रण स्वीकारलेंस. माझ्याबरोबर बसून अन्नसेवन करण्यासाठीं तूं आलास आणि माझ्या सामान्य आणि साध्यासुध्या अन्नपूजेच्या मोबदल्यामध्यें तूं मला अंतिम मुक्ति केली आहेस ! आज सकाळपर्यंत सुद्धां माझें हृदय काळजीनें इतकें जड झालें होतें, माझें डोकें जबाबदारीनें इतकें भारावून होतें, पण आतां त्यावरचें ओझें उतरलें आहे. फार दीर्घ काळापासून जसें माझें आंतरिक अस्तित्व निश्चित आणि प्रसन्न रहात असें, त्याप्रमाणें आतां माझें हृदय आणि डोकेंहि निश्चित आणि प्रसन्न आहे. माझा आंतरात्मा पूर्वी जसा तुझ्याकडे बघून स्मित करीत असे, तसें माझें शरीरहि आतां आनंदपूर्ण होऊन तुझ्यासमोर स्मित करीत आहे. हे परमप्रिया देवा, मला आतां खात्री आहे कीं, इतःपर हा आनंद माझ्यापासून कधींहि तूं काढून घेणार नाहींस. कारण, यावेळीं, मला वाटतें मला पुरेसा धडा मिळाला आहे; पुनरुज्जीवन प्राप्त करून घेण्यासाठीं क्रमाक्रमानें अनेक भ्रमांच्या सुळावर मी पुरेशी उंच चढलें आहे. भूतकाळांतील कांहींच बाकी राहिलेलें नाहीं. केवळ तें प्रभावी प्रेमच राहिलेलें आहे आणि तें मला बालकाचें निरागस हृदय आणि देवदेवतांचें विचार-स्वातंत्र्य व विचार - सुगमता प्रदान करीत आहे.
वर्ष: १९२०
२२ जून १९२०
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
पाँडिचेरी :
वर्णनातीत असा सर्व आनंद मला प्रदान केल्यानंतर, हे परमप्रिय भगवंता, तूं माझ्याकडे संघर्ष, अग्निदिव्य पाठविलें आहेस; आणि तुझ्याकडून आलेल्या एखाद्या प्रिय दूताप्रमाणें मी त्याकडे बघून स्मित केलें आहे. पूर्वी मला संघर्षाची भीति वाटत असे, कारण शांति आणि सुसंवाद यांविषयींचें माझें प्रेम त्यामुळें दुखविलें जाई. पण आतां हे देवा, मी त्याचें सहर्ष स्वागत करतें, कारण तुझ्या कार्याचा तो एक प्रकार आहे; कदाचित् विसरून जाऊं शकतील असे तुझ्या कार्याचे कांहीं घटक पुनः प्रकाशांत आणण्याचें तें एक उत्तम असें साधन आहे. आणि शिवाय त्यामध्यें एकप्रकारच्या विपुलतेचा, बहुविधतेचा, शक्तीचा अनुभव येतो. ज्याप्रमाणें मी तुला दैदीप्यमान आणि संघर्षाचा उत्तेजक या स्वरूपांत पाहिलें आहे, त्याचप्रमाणें घटनांची आणि परस्परविरोधी प्रवृत्तींची गुंतागुंत सोडवितांना, त्याचबरोबर तुझा दिव्य प्रकाश व तुझी दिव्य शक्ति यांच्यावर आवरण घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांवर अंतिम विजय मिळवितांनाहि पाहिलें आहे. कारण, या सर्व संघर्षांतून निश्चितपणें तुझीच स्वतःची अधिक परिपूर्ण सिद्धि साध्य होणार आहे.
वर्ष: १९३१
२४ नोव्हेंबर १९३१
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |
हे प्रभो, हे मधुर स्वामिन्, तुझ्या कार्यपूर्तीसाठीं जडतत्त्वाच्या अगाध गर्तेमध्यें मीं बुडी घेतली आहे; असत्य आणि अचेतना यांच्या भीषणतेला मी माझ्या बोटांनी स्पर्श केला आहे; विस्मृति आणि गाढतम अंधःकार यांच्या आसनापर्यंत मी येऊन पोंचलें आहे. पण माझ्या हृदयांत तुझ्या दिव्य स्मरणाचें सतत स्पंदन चालूं असतांना, माझ्या हृदयांतून तुझ्याप्रत येऊन पोहोंचेल अशी हांक उफाळून वर आली : “हे भगवान्, हे भगवान्, तुझें शत्रु सर्वत्र विजयी होत आहेत; असत्य हें जगाचें सम्राट् झालें आहे; तुझ्या शिवाय जीवन जगणें म्हणजे मृत्यु आहे, शाश्वत नरक आहे; अ जागा साशंकतेने बळकावली आहे आणि समर्पणाची जागा बं हिसकावून घेतली आहे; श्रद्धा आटून गेली आहे, कृतज्ञतेचा उदयहि झालेला नाहीं; अंध आवेग आणि संहारक सहज- प्रवृत्ति, अपराधशील दुर्बलता यांनीं तुझ्या प्रेमाचें मधुर नियमन झांकून टाकलें आहे, त्याचा कोंडमारा चालविला आहे. हे जगत्पते, तुझ्या शत्रूंना तूं प्रबल होऊं देणार काय? असत्य, बीभत्सता आणि दुःख यांना विजयी होऊं देणार काय? जगदीश्वरा, जिंकण्याचा आदेश दे; मग विजय ठेवलेलाच आहे. मला माहीत आहे कीं, आम्ही अपात्र आहोंत; मला माहीत आहे कीं, जगहि अजून तयार झालेलें नाहीं. पण तुझ्या कृपेवर संपूर्ण श्रद्धा ठेवून, मी तुला आर्त हांक मारीत आहे आणि मला माहीत आहे कीं, तुझी कृपाच आम्हांला वांचवील.
अशा रीतीनें, माझी प्रार्थना तीव्र वेगाने वर उसळून तुझ्याप्रत पोंचली; गर्तेच्या खोल भागांतून मी तुला तुझ्या दैदीप्यमान् वैभवपूर्ण स्वरूपांत पाहिलें; तूं प्रकट झालास आणि मला म्हटलेंस : “ धैर्य खचूं देऊं नकोस; दृढ रहा, सश्रद्ध रहा, निश्चित रहा . - मी आलोंच".
वर्ष: १९३७
२३ ऑक्टोबर १९३७
ऑडिओ सध्या | अनुपलब्ध आहे |